मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 6 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
मुख्य मार्गावर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान अप-डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान धीम्या व जलद मार्गावरील उपनगरी सेवा रद्द राहणार आहे. तसेच अप व डाऊन उपनगरी सेवा ब्लॉक कालावधीत भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट ओरिजनेट/शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते बेलापूर/ पनवेल अप आणि डाऊन रेल्वेची सेवा रद्द करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला विभागात विशेष सेवा चालविली जातील. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-पनवेल लोकल सेवा रद्द केली जाणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे - वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.
हेही वाचा - मध्य रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू