मुंबई - मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरु केले आहे. रिक्त पदांपैकी रुग्णालय, महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांची १०० पदे भरली जाणार आहेत. तास प्रस्ताव आज पालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांनी दिली.
प्रस्तावाला मंजुरी -
मुंबई महानगरपालिकेत टिचिंग आणि रुग्णांवरील उपचारांसाठी साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक अशी २० ते २५ विषयांवरील पदे असतात. पालिका रुग्णालयांतील ३ मुख्य तसेच १६ सर्वसाधारण रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापकांची १०५ पदे रिक्त आहेत. त्यापैकी १०० पदे भरावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने पालिकेच्या आरोग्य समितीत प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला. ही पदे भरल्यास रुग्णसेवा अधिक गतीमान होणार आहे. सहयोगी प्राध्यापकांना सरासरी मासिक १ लाख ८२ हजार ते २ लाख २४ हजार १०० इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.
व्हेंटिलेटर्स पालिका रुग्णालयांना देणार -
मुंबई महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी राबवलेल्या विविध मोहिमांमुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोना जम्बो आणि कोरोना केंद्रांमधील रुग्णसंख्याही कमी झाली असून या केंद्रांमधील सुमारे ७०० पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्सचा वापर सध्या होत नाही. ही व्हेंटिलेटर्स पालिका रुग्णालयांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांनी दिली.
हेही वाचा- गेल्या काही वर्षांतील औषधनिर्माण कारखान्यांना लागलेल्या आगी...