मुंबई- काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्हाला जे जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्यासोबत आघाडी करायची आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचाही समावेश आहे. वंचित सोबत आघाडी करण्याचे आमचे अजूनही प्रयत्न सुरू असून त्यासाठी चर्चा सुरूच राहील असा विश्वास काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीत आपण काँग्रेससोबत आता आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले. त्यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी हा विश्वास व्यक्त केला.
गायकवाड म्हणाले की, राज्यातील समविचारी पक्षांनी एकत्र यावे आणि जातीयवादी पक्षांचा पराभव करावा अशी आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर हे आमचे मित्र आहेत. त्यांनी आमच्यासोबत यावे अशी आमची इच्छा आहे. त्यांनी ज्या काही अटी टाकल्या आहेत त्या जातीयवादी पक्षांना पराभूत करण्यासाठी त्यांनी सोडाव्यात असे आम्हाला वाटते. आघाडी आणि जागा वाटपाची चर्चा ही उमेदवार जाहीर होईपर्यंत चालु राहते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतची चर्चा अजुन सोडली नाही. आम्हीही काँग्रेसचे उमेदवार अजून जाहीर केले नाहीत. यामुळे त्यांनी आमच्यासोबत चर्चा थांबवली तरी आम्ही मात्र त्यांच्यासोबत चर्चा सुरू ठेवणार आहोत. जेव्हा त्यासाठीचा विषय समोर येईल तेव्हा आम्ही समोर येऊ असेही गायकवाड म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही मुंबईत आघाडीमध्ये कोण जागा प्रभावीपणे जिंकू शकतो आणि सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकतो यासाठी एक फार्म्यूला ठरवला आहे. ज्या ३६ जागा आहेत त्यावर आम्ही किती घ्यायच्या आणि राष्ट्रवादीला किती व मित्र पक्षाला किती यावर अजून निर्णय झाला नाही. मात्र, जो जिंकू शकतो त्याला त्या जागा दिल्या जाणार आहेत. त्यात एखादी जागा राष्ट्रवादीला अथवा त्यांची जागा आम्हाला मिळू शकते. त्यामुळे केवळ राज्यात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही असा आमचा प्रयत्न असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.