मुंबई - गेल्या वर्षी हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईमधील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात २९ पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी एक असलेल्या दादर टिळक पुलाच्या स्लॅबचा काही भाग आज दुपारच्या दरम्यान कोसळला. या दुर्घटनेनंतर काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
हेही वाचा... राष्ट्रपती राजवटीचा पहिला फटका आदित्य ठाकरेंना, मातोश्रीबाहेरील 'आपला आमदार आपला मुख्यमंत्री' होर्डिंग्ज हटवले
दादर टीटी ते प्लाझा सिनेमा या दरम्यान दादर रेल्वे स्थानकावर टिळक पूल आहे. या पुलावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असले तरी पूल पडल्यावर या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती रखडली आहे. आज दादर स्थानकाकडून हिंदू कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या स्लॅबचा काही भाग रस्त्यावर कोसळला. यामुळे काही काळासाठी रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. पालिकेच्या पूल विभागाच्या अभियंत्यांनी पुलाची पाहणी करून मोठी काही दुर्घटना नसल्याचे स्पष्ट केल्यावर पुलाखालील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. या पुलाच्या दुरुस्तीची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच पुलाची दुरुस्ती केली जाईल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा... नवीन वर्षांपूर्वी राज्यात नवीन सरकार येणार- अजित पवार
धोकादायक २९ पैकी ८ पुलांची दुरुस्ती
अंधेरीतील गोखले पूल आणि सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिकेकडून शहरातील पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यात २९ पूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यापैकी महालक्ष्मी स्थानकातील उड्डाणपूल, करीरोड स्थानकातील उड्डाणपूल, शीव स्थानकातील उड्डाणपूल, सायन येथील उड्डाणपूल, दादर येथील टिळक पूल, दादर फुल मार्केटजवळील पूल, माहीम फाटक येथील पादचारी पूल, धारावी नाल्यावरील पूल, असे ८ धोकादायक पूल पाडण्यात आले आहेत. ८ पुलांच्या दुरुस्तीवर पालिका प्रशासन १६ कोटी ९१ लाख १४ हजार ९६३ रुपये खर्च करणार आहे. इतर पुलांवर जास्त भार असलेली वाहने नेऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा... महापौरपदाच्या आरक्षणाची आज सोडत; मुंबईसह 27 महापालिकांचा यात समावेश
धोकादायक पूल
घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, चिंचपोकळी (ऑर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज, भायखळा रेल ओव्हर ब्रिज, मारिन लाइन्स रेल ओव्हर ब्रिज, ग्रॅण्ट रोड - फेरर रेल ओव्हर ब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि मुंबई सेंट्रलच्या मध्ये), बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज, प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज, वीर सावरकर रेल ओव्हर ब्रिज (गोरेगाव आणि मालाडच्या मध्ये), सुधीर फडके रेल ओव्हर ब्रिज, बोरिवली, दहिसर रेल ओव्हर ब्रिज, मीलन रेल ओव्हर ब्रिज, सांताक्रूझ, विलेपार्ले रेल ओव्हर ब्रिज, गोखले रेल ओव्हर ब्रिज, अंधेरी.
हेही वाचा... घाटकोपरच्या महिला महाविद्यालयातील युवती करणार काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास
दीड वर्षात ३ पूल दुर्घटना
२९ सप्टेंबर २०१७ मध्ये एलफ्निस्टन या गजबजलेल्या रेल्वे स्थानकातील पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधिक जण जखमी झाले होते. ३ जुलै २०१८ रोजी अंधेरी स्थानकातील गोखले पूलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत पुलावरून जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण जखमी झाले होते. त्यानंतर १४ मार्च २०१९ ला संध्याकाळी ७.३० च्या सुमारास सीएसएमटी स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू व ३१ जण जखमी झाले होते.