मुंबई - पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर सर्व स्तरातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. आज मंगळवारी मुंबईच्या डब्बेवाल्यांनी देखील नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून अंधेरी, लोअर परेल, चर्चगेट, वांद्रे या ठिकाणी मदत फेरी काढली. यातून जमा होणारी रक्कम पूरग्रस्तांच्या निवारणासाठी पाठवण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या असमानी संकटानंतर मुंबईतील गणेशोत्सव मंडळ तसेच विविध संघटना पुढे आल्या होत्या. यानंतर मुंबईकरांची भूक शमवणाऱ्या डब्बेवाल्यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावर मदतफेरी काढली. ही मदतफेरी १५ ऑगस्टपर्यंत विविध रेल्वे स्थानकात फिरणार असून यात जमा होणारा निधी 17 ऑगस्टला सांगली, कोल्हापूरला पाठवला जाणार आहे. मदत फेरीच्या पहिल्याच दिवशी खूप चांगला प्रतिसाद डब्बेवाल्यांना मिळाला आहे.
देशात कुठेही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यानंतर मुंबईकर हा सदैव मदतीस तत्पर असतो. हे आजही आम्हाला मदतफेरी काढल्यानंतर जाणवले,अशी प्रतिक्रिया नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी यावेळी दिली आहे.