मुंबई - जागतिक पातळीवर ज्यांच्या व्यवस्थापनाची नोंद घेतली जाते, अशा मुंबईचा डबेवाला यांची यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्व क्षेत्र अडचणीत सापडले आहेत. त्याला मुंबईचे डबेवालेही अपवाद नाही. घरोघरी, ऑफिसमध्ये डबे पोहोचवणारे डबेवाले आता अडचणीत सापडले आहेत. याच डबेवाल्यांनी आता सरकार दरबारी मदतीची मागणी केली आहे.
डबेवाल्यांना महिन्याला 5 हजाराची मदत द्यावी -
मुंबईमध्ये साधारण साडेचार ते पाच हजार डबेवाले आहेत. मात्र, आता मुंबईमध्ये फक्त 50 टक्केच डब्बेवाले शिल्लक राहिले आहे. लोकल प्रवास बंद, ऑफिस बंद यामुळे डबेवाल्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. कोणी गावी जाऊन शेती करतो, तर कोणी मुंबईमध्ये रिक्षा चालवत आहेत. याप्रमाणे हाताला मिळेल ते काम करून डबेवाले आपला उदर्निवाह करत आहे. घरची परिस्थिती हालाखीची आहे. एकेकाळी 'मॅनेजमेंट गुरू' म्हणून ज्यांचे नाव लौकिक होते, ते डबेवाले आज कर्जबाजारी झाले असल्याचे सुभाष तळेकर यांनी सांगितले. या डबेवाल्यांना महिन्याला 5 हजाराची मदत सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.