मुंबई- तौक्ते चक्रीवादळात झालेल्या बार्ज दुर्घटनेप्रकरणी ओएनजीसीच्या 3 एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्सना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात चौकशी पूर्ण होईपर्यंत हे तिघे निलंबित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या कमिटीने दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतलेला आहे. ज्या तीन संचालकांना निलंबित करण्यात आलेले आहे ते ओएनजीसीच्या ड्रिलिंग, सुरक्षा, वेब, शोध या गोष्टींसाठी जबाबदार आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी नुसार तौक्ते चक्रीवादळाकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणा केला गेल्याचं समोर आलंय.
मुंबईच्या अरबी समुद्रात चक्री वादळात अडकलेल्या पी 305 बार्ज वरील 188 जणांना नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न करून वाचण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 86 लोकांचा मृत्यू झाला आहे. समुद्रात बुडालेल्या पी 305 बार्ज व टग बोटवरील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या डायव्हर्स कडून प्रयत्न केला गेला होता. या शोधमोहिमेत काही मृतदेह आढळले होते. ते मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, या मृतदेहाची ओळख पटवण्यास अडचणी येत असल्याने त्यांची डीएनए चाचणी केली गेली त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाइकांना सोपवण्यात आले होते.
'बार्ज पी305'च्या कॅप्टनवर गुन्हा दाखल
अरबी समुद्रात पी-३०५ हे बार्ज बुडाल्याप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बार्जवरील अभियंते मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला. चक्रीवादळाची सूचना असतानाही, कॅप्टन राकेश बल्लव याने बार्ज वेळीच न हलवता, इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. यानंतर बार्ज बुडून काही कर्मचारी जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.