मुंबई - शहरातील आगी लागण्याचे सत्र थांबले असताना आता स्लॅब कोसळून ३ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जोगेश्वरी येथील नटवरनगरमधील त्रिमूर्ती इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. लॅब अंगावर कोसळल्याने विनय केळुस्कर (वय २५), सुहास केळुस्कर (वय ५१), सुजिता केळुस्कर (वय ४३) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा - 'कॅग'चा फडणवीसांवर ठपका, शिवसेनेकडून न्यायालयीन चौकशीची मागणी
जोगेश्वरी येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ नटवरनगर आहे. या नटवरनगरमध्ये तळमजला अधिक तीन अशी चार मजली त्रिमूर्ती इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर केळुस्कर कुटुंबीय राहतात. पहाटे ६.५३ च्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या केळुस्कर कुटुंबीयांच्या घरात कोसळला. स्लॅब कोसळला त्यावेळी केळुस्कर कुटुंबीय झोपेत होते. या घटनेतील जखमींना तातडीने जवळच्या खसगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी विनय व सुहास यांची प्रकृती स्थिर असल्याची तर सुजिता यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना बेड्या; 'सराफ'च निघाला टोळीचा म्होरक्या