मुंबई - क्रूजवरील पार्टी प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांपैकी ४ जणांना मेडिकल टेस्टसाठी जे जे रुग्णालयात नेल्यानंतर किला कोर्टात हजर केले आहे. आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने आधीच अटक केली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे स्वतः या प्रकरणात मुख्य भूमिका बजावत आहेत. मेडिकल तपासणीनंतर त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आले आहे. दरम्यान आर्यन खानसह तिघांना 1 दिवसाची एनसीबी कोठडी मिळाली आहे. याच दरम्यान त्यांच्या मोबाइलची देखील तपासणी केली जाणार आहे.
या ड्रग्स प्रकरणात 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि 22 एमडीएमए ड्रग्सच्या गोळ्या जप्त करण्यात आले आहेत. शिवाय 1 लाख 33 हजार रुपयांची रक्कमही जप्त केली आहे.
रिया चक्रवर्तीची केस लढवणारे अॅड. माने-शिंदे लढवणार केस -
शाहरुख खानचा मुलाची केस अॅड. सतीश माने-शिंदे हे लढणार आहेत. अॅड. माने हे किल्ला कोर्टमध्ये पोहोचले आहेत. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणाची केसही अॅड. माने-शिंदे यांनीच लढवली होती. मुंबई ते गोवा क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यासहित त्याचा मित्र अरबाज आणि अन्य सहा जणांना एनसीबीने अटक केली आहे.
काय आहे प्रकरण ?
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. दरम्यान, एनसीबीने पार्टीच्या आयोजकांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि ही कारवाई केली.
हेही वाचा - आर्यन खानसह तिघांना एनसीबीकडून अटक; शाहरुख खानच्या मुलाची केस लढणार अॅड. सतीश माने-शिंदे