मुंबई - मुंबईमध्ये १३ ते १८ जून हे सलग आठ दिवस समुद्राला मोठी भरती आहे. या भरती दरम्यान नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून समुद्रात मंगळवारी (दि. १४ जून) चार युवक पोहण्यास गेले होते. त्यापैकी ३ युवक समुद्रात बुडाले होते. आज (बुधवार) या तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यांना कूपर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे.
३ जणांचे मृतदेह आढळले - काल (मंगळवार) चौपाटी येथील जे डब्लू मेरियट हॉटेल जवळील समुद्रात सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ४ युवक पोहण्यास गेले होते. त्यापैकी ३ जण समुद्रात बुडाले. अग्निशमन दल आणि नौदलाकडून त्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, या ३ जणांचा शोध लागला नसल्याने शोध कार्य आज सकाळी बंद करण्यात आले होते. आज कौस्तुभ गुप्ता ( वय १८ वर्षे), प्रथम गुप्ता (दि. १६ वर्षे) यांचे मृतदेह पोलिसांना आढळून आले तर अमन सिंग (वय २१ वर्षे) याचा मृतदेह लाईफ गार्डला आढळून आला आहे. या तिघांचे मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
तर लाईफ गार्ड, खर्च काय कामाचे - जुहू चौपाटी येथे काल सायंकाळी ४ च्या सुमारास समुद्रात पोहायला गेलेले ३ युवक बुडाले. ही घटना माझ्या समोर घडली. ती पोहणारी मुले वाचवण्यासाठी हात दाखवत होती. लाईफगार्ड कुठं आहेत, तेथील फोटोग्राफर ओरडत होते. काही वेळातच तिथे तीन लाईफ गार्ड आले. मात्र, ते तीनही लाईफ गार्ड किनाऱ्यावरुन पाहत होते. काही वेळाने एक लाईफ गार्ड पाण्यात उतरला पण तोही त्यांच्यापर्यंत पोहचला नाही. तो लगेच परत आला काही वेळाने ते तिघेही मुले दिसेनासे झाले. त्यानंतर मी तेथील काही लोकांना विचारपूस केली तर ते म्हणाले की काल पण एक व्यक्ती असाच पाण्यात बुडाला. त्याचा मृत्यू झाला. हे लाईफगार्ड असेच पाहत राहिले. लाईफगार्ड नियुक्त करण्यासाठी पालिका लाखो रुपये खर्च करते. त्यानंतरही ते बुडणाऱ्या लोकांना वाचवू शकत नसतील तर अशा लाईफ गार्डचा आणि त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाचा उपयोग काय असा प्रश्न पत्रकार व या घटनेचे प्रत्यक्षदर्शी युवराज नायर याने उपस्थित केला आहे.
समुद्राला मोठी भरती - मुंबई महापालिकेने येत्या पावसाळ्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात तब्बल २२ वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यापैकी जून महिन्यात १३ ते १८ जून असे एकूण सहा दिवस मोठी भरती येणार आहे. त्यापैकी गुरुवारी १६ जून रोजी सर्वात मोठी भरती येणार असून लाटांची उंची ४.८७ मीटर असणार आहे. यावेळी नागरिक आणि पर्यटकांनी समुद्र किनारी ( Tourists not go to Beach ) जाऊ नये, असे आवाहन मुंबई महानगर महापालिकेने केले आहे.
सलग आठवडाभर भरती -
जून १३ रोजी सकाळी ११.०८ वाजता ४.५६ मीटर
जून १४ रोजी सकाळी ११.५६ वाजता ४.७७ मीटर
जून १५ रोजी दुपारी १२.४६ वाजता ४.८६ मीटर
जून १६ रोजी दुपारी १.३५ वाजता ४.८७ मीटर
जून १७ रोजी दुपारी २.२५ वाजता ४.८० मीटर
जून १८ रोजी दुपारी ३.१६ वाजता ४.६६ मीटर
हेही वाचा - IMD issues alert : येत्या 5 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटसह वादळाची शक्यता