मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात एटीएसकडून तपास केला जात आहे. मात्र या प्रकरणाचे काही धागेदोरे हे दिल्लीतील तिहार जेलमध्ये असल्याचेही समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान काही गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला आहे. मात्र अधिकृतरित्या त्यास दुजोरा देण्यात आलेला नाही.
जैश-उल-हिंदचा ग्रुप तिहार जेल मधून बनविला-
तपास यंत्रणांनी सायबर एजन्सीच्या माध्यमातून केलेल्या तपासादरम्यान ज्या टेलीग्रामवर 'जैश उल हिंदचा' ग्रुप बनवण्यात आलेला होता, त्याचे लोकेशन तिहार जेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. हा ग्रुप बनवण्यासाठी ज्या मोबाईलचा वापर करण्यात आला होता. त्या मोबाईलच्या सिम कार्डचे लोकेशन हे तिहार जेलमध्ये दाखवले जात आहे. 26 फेब्रुवारीला जैश-उल-हिंद नावाचा सदरचा टेलिग्राम ग्रुप बनवण्यात आल्याचेही समोर आलेला आहे. यासाठी टिओआर सारख्या डार्क नेटचा वापर करण्यात आल्याचेही तपास यंत्रणांच्या सूत्रांकडून कळत आहे.
त्या ग्रुपवरून खंडणीची मागणी-
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या घटनेची जबाबदारीही काही दिवसांपूर्वी टेलिग्राम सारख्या सोशल माध्यमांवर जैश-उल- हिंद या संघटनेने घेतलेली होती. या बरोबरच टेलिग्रामवरील या ग्रुपवर झालेल्या पोस्टमध्ये मुकेश अंबानी यांच्याकडे खंडणीची मागणी सुद्धा करण्यात आलेली होती. मात्र त्यानंतर काही तासातच जैश-उल-हिंद संघटनेने सदरची पोस्ट त्यांनी केली नसल्याचे स्पष्ट करत मुकेश अंबानी प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचेही स्पष्ट केलं होते.