मुंबई - एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) ३१ मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटचा दिवशी दोन्ही सभागृहात केले आहे. याशिवाय आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीसुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता त्यांना एसटी कर्मचाऱ्यांकडून चक्क धमकीचे फोन (Sadabhau Khot Threat call) येत असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
सदाभाऊ खोत काय म्हणाले? : 'ईटीव्ही भारत'ला आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसात मला काही फोन आले आहेत. एसटी संपामध्ये आपण मध्यस्थी करू नका असा धमकीवजा इशारा देण्यात आला. आपण मध्यस्थी केली तर कर्मचाऱयांचे भले होणार नाही. याशिवाय आत्महत्या केलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचा फोटोही मला पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये यांच्या आत्महत्येला तुम्ही जबाबदार आहात असाही माझ्यावर आरोप करण्यात आला आहे. एकंदरीतच कर्मचाऱ्यांची मनस्थिती अद्यापही सावरलेली नाही. माझे अजूनही त्यांना आवाहन आहे की कामावर रुजू व्हावे, मला अपेक्षा आहे की ते सोमावारपर्यत मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झालेले कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील.
धमकीचे फोन जाणे दुर्देवी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व एसटी कामगारांचे नेते श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, सध्या एसटी कर्मचारी खूप नैराश्यात आहे. गेल्या साडे चार महिन्यापासून संपात सहभागी आहेत. त्या कर्मचाऱ्यांना वेतन नाही. त्यामुळे कर्मचारी टेंशनमध्ये असून, अशा प्रकारचे काही कर्मचाऱ्यांकडून उलटसुलट फोन केले जात आहेत. आम्हाला पण अशाच प्रकारचे धमकीचे फोन आले आहेत. आमदार सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात प्रामाणिकपणे सहभागी झाले होते, त्यांना न्याय मिळणून देण्यासाठी प्रयत्न करत होते. आमची त्यांची विचारधारणासुद्धा वेगळी असली तरी, सदाभाऊ खोत स्वतः आझाद मैदानावर दहा ते बारा दिवस थांबले होते. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः सरकारशी चर्चा करत होते. आज अशा पद्धतीने त्यांना धमकीचे फोन येणे हे अत्यंत दुर्देवी आहे.
एसटी कर्मचाऱयांनी थांबायला हवे : एसटीचे विलीनीकरण जशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे, तशी आमचीसुद्धा आहे. विलीनीकरणाच्या मागणीवरून आम्ही तसूभरसुद्धा मागे हटलो नाहीत. मात्र, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जरी त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळ शासनात विलिनीकरण करणे शक्य नाही, असे जरी म्हटले असले तरी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. न्यायालय यावर योग्य मार्ग काढेल असा आमचा विश्वास आहे. सध्या राज्य सरकारने विलीनीकरणाची मागणी सोडली तर, एसटी कर्मचाऱ्यांना मोठी वेतन वाढ दिली आहे. त्यामुळे मला असे वाटते की कर्मचाऱ्यांचे बऱ्यापैकी समाधान झाले आहे. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतोय म्हणून महामंडळाने पत्रसुद्धा काढले आहे. मात्र, अजूनही कर्मचारी संभ्रमात आहेत, कारण कमी वेतनामुळे एसटी कर्मचारी चेपला गेला आहे. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. मात्र, आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आता कामावर कर्मचाऱ्यांनी थांबायला हवे, असेसुद्धा श्रीरंग बरगे यांनी 'ईटीव्ही'ला सांगितले आहे.