मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सहकार खातं गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. याकडे आम्ही सकारात्मकतेने पाहतो असे स्पष्ट करतानाच राज्यातील सहकाराचं चांगुलपण कुणाला बघवत नसेल तर मग पाहू असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
शाह यांना सहकाराचा अनुभव
केंद्र सरकारने नव्या सहकार खात्याची निर्मिती केली आहे आणि या खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल असा अंदाज बांधण्यात येत आहे. या खात्याचे निर्मितीवर विरोधी पक्षाने देखील टीका केलेली आहे. शाह यांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे ते या क्षेत्रात काहीतरी चांगलं करतील. सहकार खातं त्यांच्याकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सहकार चांगला आहे. कुणाला महाराष्ट्राचं हे चांगुलपण पाहावसं वाटत नसेल तर मग पाहू, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
त्यांना चांगलं काम करावंसं वाटत असेल
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शाह सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते असल्याचे सांगितले आहे. शाहांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या ते अंमलात आणतील. त्यांना या क्षेत्रात काही चांगलं काम करावं वाटत असेल त्यामुळे हे खातं त्यांनी त्यांच्याकडे घेतलं आहे. ते सहकारासाठी चांगले निर्णय घेतील असेही राऊत यावेळी म्हणाले.
सहकार राज्याचा विषय
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सहकारावर भाष्य केलं आहे. सहकार हा विषय राज्याचा आहे. राज्याच्या कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही हे पवारांनी सांगितलं आहे. पवारांएवढा सहकारावर अधिकारवाणीने बोलणारा नेता आणि तज्ज्ञ नाही असे राऊत म्हणाले.
हेही वाचा - देशातील पहिला एलएनजी रिफिलिंग स्टेशन विदर्भात सुरू; केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते झाले उद्घाटन