मुंबई - मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका सोने व्यापाऱ्याचे तब्बल अडीच किलो सोने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या चोरीच्या प्रकरणात मुंबई पोलीस खात्यातील एका पोलीस शिपायाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाचा तपास करत तब्बल 52 लाख 6 हजार रुपयांचे 1045 ग्राम सोने हस्तगत केले असून, उरलेल्या सोन्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस तपासणीच्या नावाखाली गाडीची झडती
या प्रकरणातील तक्रारदार भरत कुंदन लाल जैन हे मुंबईतील शिवडी परिसरातील रहीवासी आहेत. 31 मे रोजी त्यांच्याकडील असलेले 1 कोटी 25 लाख किमतीचे 2480 ग्राम सोने घेऊन ते त्यांच्या वाहनाने रस्त्यावरून जात होते. तेव्हा पोलीस शिपाई खालील कादर शेख, रवींद्र कुंचिकोर्वे व संतोष नाकटे या तिघांनी तक्रारदार कुंदनलाल जैन यांची गाडी रस्त्यावर अडवून, त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. यातील खालील कादर शेख याने पोलीस तपासणीच्या नावाखाली त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांना अडीच किलो सोने आढळून आले.
पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे सांगून सोने घेऊन त्यांनी जागेवरून पलायन
यानंतर या तिघांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने मिळाल्यामुळे त्याची नोंद नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी लागेल, असे सांगत तक्रारदारांचे सोने घेऊन जागेवरून पोबारा केला. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर क्राईम ब्रँच युनिट 3 कडून याचा तपास केला जात असताना, खालील कादर शेख (47), रवींद्र कुंचिकोर्वे (37), संतोष नाकटे(27) या तीन आरोपींना अटक केली आहे. तर महेश जाधव (36), नरेंद्र गायकवाड (47), भावेश जैन ( 37) या तीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.. दोन अभिनेत्रींसह पाच जणांना अटक