मुंबई - वासुदेव म्हटलं की आजही डोळ्यासमोर पहाटे घरोघरी हिंडून विठ्ठलाचे अभंग गाऊन उठवणारी व्यक्ती आठवते. मुंबईत आता फारसा वासुदेव दिसत नसला तरी ९० च्या दशकातल्या अनेकांना आजही वासुदेव आणि त्याचं ते साद घालणं आठवतं. आजही मुंबईतील अनेकांना वासुदेव म्हटलं की मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, धोतर घातलेला वासुदेव आठवतो. मात्र, आता वासुदेव आता दिसतंच नाहीत का, पाहा ईटीव्ही भारत विशेषमध्ये..
वासुदेव नाव कसे प्रचलित झाले
वासुदेव यांनाच 'थुकोट' असेही नाव आहे. महानुभाव साहित्यामध्ये यांचा 'भ्रीडी' असा उल्लेख आढळतो. 'हरबोला', 'जागाकापडी', 'अंतवैदिन कापडिया' ही देखील यांचीच नावे. 'वासुदेव' ही महाराष्ट्रातील प्राचीन परंपरा असून वासुदेव, वासुदेव गोंधळी, वासुदेव जोशी असे उपप्रकार दिसून येतात. एका ब्राह्मण ज्योतिषास कुणबी स्त्रीपासून झालेला पुत्र 'सहदेव' हा या जमातीचा मूळ पुरुष मानतात. भगवान श्रीकृष्णाने यादवकुळातील लोकांना निरनिराळी कामे नियुक्त करून दिली. वासुदेव समाजाच्या पूर्वजांना लोकांच्या कुळांचा उद्धार करण्याचे काम सोपवले. तेव्हापासून वासुदेवाकडे कुळी वाचून दाखवण्याचे काम आले. वाचून दाखवणे, वाचून देणे या शब्दांत कालांतराने बदल होऊन 'वाचदेव' असा शब्द रूढ झाला आणि याच शब्दाचे अपभ्रंश रूप ' वासुदेव ' सध्या प्रचलित आहे.
मोरपीसाच्या टोपीला अत्यंत महत्व
कृष्णाचे भक्त म्हणवून घेणारी ही जमात कृष्णाची प्रतीके आपल्या वेशभूषेत सन्मानाने वागविते. मोरपिसांचा उंच टोप, घेरदार झगा, सुरवार, खांद्यावर उपरणे, गळ्यात झोळी, कंबरेला छोटी बासरी (पावरी) अशा रूपात हे वासुदेव त्यांच्या ठराविक गावांमध्ये भिक्षाफेरी मारतात. या सर्व वेषभूषेमध्ये मोरपिसाच्या टोपीला अत्यंत महत्त्व आहे. भिक्षाफेरीसाठी निश्चित केलेल्या गावांमध्ये भिक्षा मागतानाच ते ही टोपी वापरतात. इतरत्र नाही.
भिक्षेतून ते आपला उदरनिर्वाह चालवतात
खासगाव, ता. जाफराबाद, जि. जालना तसेच खानदेशात बरीचशी वासुदेवांची घरे आहेत. खानदेशमध्ये चांगदेव जत्रेत यांची जातपंचायत होत असे. आता ही कालबाह्य झाली असून नवीन पिढी वादविवादांसाठी न्यायालयाचा अवलंब करताना दिसते. महाराष्ट्रामध्ये काही भागात नवजात शिशुच्या पाचवीच्या पूजेला वासुदेव मंडळींना आवर्जून बोलावतात. हे लोक या दिवशी पूजा करतात. बाळाची दृष्टीबाधा निवारण करतात आणि शिशुला मंगल आशीर्वाद देतात. वासुदेवाला दिलेले दान देवदेवतांना, पितरांना पोहोचते अशी समजूत असल्याने लोक त्यांना कधीही रिकाम्या हाताने पाठवीत नाहीत. त्यांच्या झोळीला 'कामधेनू' असे यथार्थ नाव आहे. याच झोळीत आलेल्या भिक्षेतून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. वासुदेव राम प्रहरी गात नाचत येतो आणि लोककल्याणार्थ तसेच वाडवडिलांचा उद्धार करण्यासाठी दान करा, असे गाण्याद्वारे सांगतो.
शिवरायांच्या काळात या वासुदेवांनी बहुरुप्याचे कामदेखील केल्याचे उल्लेख आहेत. कोणत्याही निमंत्रणाविना सकाळीच 'दान पावलं'चा घोष करीत गावाला जाग आणणारे वासुदेव आता मात्र अभावानेच दिसतात. पहाटे पहाटे येऊन गाव व शहर जागवणे, लहान-थोरांना निरनिराळ्या कथा सादर करणे, बाळ-गोपाळांचे मनोरंजन करणे ही सर्व कामे हौसेने करणारा वासुदेव आता कालबाह्य होत आहे. प्रत्यक्ष वासुदेवांचे दर्शन दुर्मिळ झाले असले तरीही काही मराठी बहुल भागात दादर, प्रभादेवी कुर्ला येथे व मंदिरांसमोर आजही भिक्षा मागताना ही मंडळी सकाळी-सकाळी दिसतात.
हेही वाचा - जालन्यातील सीताफळांना दिल्लीत मिळतोय चौपट भाव; "विकेल ते पिकेल" धोरणाचा झाला फायदा