मुंबई - पुणे शहरात वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो. राज्य सरकारने यात सुधारणा करण्याचा आणि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यासाठी प्रस्तावित स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गाला ( Swargate to Katraj Metro ) मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी (दि. 20 एप्रिल) मान्यता दिली. मेट्रोमुळे वाहतुकीला गती येणार आहे.
गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबा नगर, आंबेगाव अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च आणि प्रवास कालावधीत बचत होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच पुणे आणि पिंपरी शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायी प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोमार्गे फायदेशीर ठरणार आहे.
पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा एक विस्तारित स्वारगेट ते कात्रज (कॉरिडॉर-2ए) या 4.464 किलोमिटर लांबीचा, 3 स्थानके असणार आहेत. या प्रकल्पाला 3 हजार 667.4 कोटी खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत भुयारी मार्ग हाती घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी 450.95 कोटीचे अनुदान केंद्र व राज्य शासनाचे कर शुल्कावरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम स्वरूपाचे कर्ज 440.32 कोटी, असे 891.27 कोटी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेकडून 450.95 कोटी अनुदान, भूसंपादन पुनर्वसन, पुनर्वसाहत व बांधकाम कालावधीसाठी 204.14 कोटी, असे एकूण 655 कोटी मेट्रोला उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर केंद्र शासनाकडून 363 कोटी इतके अनुदान प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनाला विनंती केली आहे. 2027 पर्यंत मेट्रोचा मार्ग पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.