मुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगात फिरत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा पोलिसांनी जबाब देखील घेतला आहे. उर्वरीतांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली असून अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रमाणे शुक्ला पळून जाऊ नयेत, यासाठी गृह विभागाने पोलिसांना करडी नजर ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापने दरम्यान तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्यातील सध्याचे महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत, नाना पटोले, बच्चू कडू, संजय काकडे, राजेंद्र यड्रावकर, आशिष देशमुख यांच्यासहित अनेकांचे फोन टॅप केले. कोणाला कळू नये, यासाठी चुकीच्या पद्धतीने नाव घेण्यातआले. आनावांचा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. फोन टॅपिंगसाठी गृहविभागाची परवानगी लागते. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात शुक्ला यांनी पदाचा दुरुपयोग करत राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा मुद्दा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात मांडला. फडणवीस यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा महाविकास आघाडीचा संशय आहे. त्यानुसार चौकशीला सुरुवात झाली आहे. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे किमान १६७ तास जबाब नोंदवण्यात आले. उर्वरितांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. जबाबात पोलिसांना काय माहिती मिळाली, त्याचा अहवाल लवकरच समोर येईल. मात्र या प्रकरणामुळे रश्मी सध्या तरी चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.
शुक्ला यांच्यावर गृह विभागाची नजर - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली. देशमुख सफह्य या प्रकरणात ईडीच्या ताब्यात आहेत. मात्र आरोप केलेले परमवीर सिंग स्वतःच अडचणीत आले. ६ हून अधिक प्रकरणात परमबीर विरोधात ३ पोलीस उपायुक्त आणि डझनभर पोलीस अधिकारी यांच्या सिंडिकेटबद्दल राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये धमकावणे आणि खंडणीचे गुन्हे दाखल झाले. १०० कोटीच्या वसुली प्रकरणात न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी समितीने ५ समन्स पाठवले. एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह आणि एंटीलिया येथील जिलेटीनच्या कांड्या सापडल्यामध्ये अनेक प्रश्न परमबीर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले. अडचणी वाढल्याचे लक्षात आल्यानंतर, परमबीर सिंग यांनी देशाबाहेर पळ काढल्याची सीआयडीची माहिती आहे. आता रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या तापसाने वेग आल्याने शुक्ला देश सोडून पलायन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गृह विभागाने शुक्ला यांच्यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर विभागात कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत, महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीचे रॅकेट उघडकीस आणले होते. रश्मी शुक्ला यांनी हा अहवाल देऊनही राज्य सरकारने त्यावर कोणतीच कारवाई केली नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला होता. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. या अहवालानंतर राज्य गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी भारतीय टेलिग्राफी अॅक्ट कलम ३०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४३ व ४६ तसेच ऑफिशियल सीक्रेट ऍक्ट ०५ अन्वये सायबर पोलिसानी समन्स धाडले होते.