मुंबई - दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण रोज वाढत असताना एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी गेल्या अठरा दिवसात 15 दिवसांनी वाढला आहे. त्यामुळे आता रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 33 दिवसांवर पोहोचला आहे. काल हा कालावधी 30 दिवसांवर होता. मुंबईत रुग्ण दरवाढीचा कालावधी वाढत असल्याने कोरोना विषाणूला रोख लावण्यात पालिकेला काही प्रमाणात यश येत असल्याचे दिसत आहे.
मुंबईत कोरोना विषाणूचे 18 जूनपर्यंत 62 हजार 799 रुग्ण आढळून आले असून, 3 हजार 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 31 हजार 856 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत रोज कोरोनाचे हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण रोजच वाढत असले तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. 1 जूनला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 18 दिवस होता. 10 जूनला हा दर 25 दिवसांवर गेला होता. 17 जूनला हा दर 30 दिवसांवर पोहोचला होता. 18 जूनच्या आकडेवारीप्रमाणे हा दर 33 दिवसांवर पोहोचला आहे. रूग्ण वाढीचा सरासरी दर आज 2.15 टक्के असून काल हा दर 2.30 टक्के होता. 1 जूनला हा सरासरी दर 3.85 टक्के होता तर 10 जूनला 2.82 टक्के होता.
खार येथील एच पूर्वने आज मोठी उडी घेतली असून, त्यांचा रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 69 दिवसांवर पोहोचला आहे. रूग्ण वाढीचा सरासरी दर फक्त 1 टक्के म्हणजेच सर्वात कमी आहे. भायखळा येथील ई विभागात रुग्ण वाढीचे प्रमाण 61 असून रूग्ण वाढीचा सरासरी दर 1.1 टक्के तर दादर माटुंगा येथील एफ उत्तरमध्ये रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 60 दिवस आणि रूग्ण वाढीचा सरासरी दर 1.2 टक्के आहे.
चेंबूर पूर्व येथील एम पूर्व विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 54 दिवस असून रूग्ण वाढीचा सरासरी दर 1.3 टक्के इतका आहे. कुर्ला येथील एल विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 53 दिवस असून रूग्ण वाढीचा सरासरी दर 1.3 टक्के इतका आहे. सॅन्डहर्स्ट रोड येथील बी विभागात 49 ( 1.4 टक्के); एल्फिस्टन येथील जी दक्षिण विभागात 48 ( 1.5 टक्के); दादरच्या जी उत्तर विभागात 44 ( 1.6 टक्के); आणि कुलाबा फोर्ट येथील ए विभागात 43 (1.6 टक्के) दिवस इतका आहे.