मुंबई : राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. पण आता राज्याची चिंता वाढवणार आणखी एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात रेमडेसीविर इंजेक्शनची गरज अर्थात मागणीही वाढली आहे. 20 सप्टेंबर आधी राज्यात जिथे दिवसाला 9 हजार इंजेक्शन लागत होते तिथे गेल्या आठवड्यापासून दिवसाला सरासरी 21 हजार इंजेक्शन लागत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. याचाच अर्थ गंभीर रूग्ण वाढत असून त्यामुळे ही चिंताजनक बाब मानली जात आहे.
इंजेक्शनचा तुडवडा कुठेही नसून पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात असल्याचा दावा ही यानिमित्ताने एफडीएने केला आहे. राज्यात 27 सप्टेंबरपर्यंत 273228 रूग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर दररोज 17 ते 18 हजार रूग्ण दररोज आढळत आहेत. यात गंभीर रुग्णही मोठ्या संख्येने असून अशा रुग्णांना वाचवण्यासाठी रेमडेसीवीरचा वापर डॉक्टरांना करावा लागत आहे. एका रुग्णाला एकापेक्षा अधिक इंजेक्शन लागतात. त्यानुसार गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसीविर इंजेक्शनचा वापरही वाढत आहे. त्यामुळेच 20 सप्टेंबरच्या आधी राज्यात दिवसाला सरासरी 9 हजार इंजेक्शन लागत होते. पण 21 सप्टेंबरपासून 20 ते 22 हजार इंजेक्शन लागत आहे.
सरासरी काढली तर दिवसाला 21 हजार इंजेक्शन लागत असल्याची अधिकृत माहिती एफडीएतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. तर ही वाढती मागणी पूर्ण केली जात असून राज्यात कुठेही इंजेक्शनचा तुडवडा नाही, असा दावा ही त्यांनी केला आहे. तर राज्यात कुठेही काही तक्रार असेल वा इंजेक्शन उपलब्ध होत नसेल तर त्वरित एफडीएशी संपर्क साधावा असे आवाहन ही या अधिकाऱ्याने केले आहे. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 ते 22 हजार रेमडेसीवीरची इंजेक्शनची गरज लागत आहे. तर त्या तुलनेत अधिक इंजेक्शन रोज उपलब्ध करून दिली जात आहेत. दररोज 6 कंपनीकडून 30 हजार इंजेक्शन मागवले जात आहेत. हेट्रो, सिप्ला, डॉ रेड्डीज, मायलानसह अन्य दोन कंपन्या ही मागणी पूर्ण करत आहेत. आलेला हा इंजेक्शनचा साठा त्या त्या जिल्ह्याच्या मागणीनुसार पाठवला जात आहे.
मुंबईत दिवसाला 2300, पुण्यात 2100, नांदेडमध्ये 1078, नाशिकमध्ये 1473 तर ठाणे-रायगड-पालघरमध्ये 5530 इतकी इंजेक्शन लागत आहेत. पण ही वाढती इंजेक्शनची मागणी पाहता गंभीर रुग्ण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे.
यासंदर्भात माहिती देताना एफडीएचे (औषध) सहआयुक्त जुगलकिशोर मंत्री म्हणाले, की 20 सप्टेंबर पासून रेमडेसीविरचा वापर दुपटीने वाढला आहे. त्यामुळेच 20 सप्टेंबर आधी 9 हजार रेमडेसीविर इंजेक्शन दिवसाला लागत होते तिथे आता दिवसाला सरासरी 21 हजार इंजेक्शन लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मागणी प्रचंड वाढली आहे.