मुंबई - काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीविषयी भाष्य करणाऱ्या 23 नेत्यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्लीमध्ये बोलावेल आहे. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसमध्येही बदलाचे वारे वाहत आहेत. मुंबईत अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू झालं आहे. ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
काँग्रेस पक्षाला अनेक निवडणुकीत येत असलेले अपयश तसेच नेत्यांची विधाने यामुळे काँग्रेसमध्ये काही आलबेल नाही, याची प्रचिती येत होती. यातच पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करणारे पत्र सोनिया गांधी यांना लिहले होते. त्यानंतर पत्रावरून देशपातळीवर चर्चा झाली. बिहार विधानसभा आणि हैदराबाद महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, यापेक्षा जास्त महत्त्वाचा नेत्यांच्या नाराजीचा प्रश्न हा काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यापुढे होता. सोनिया गांधी यांनी नाराज नेत्यांची भेट घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी केली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनी शनिवारी दहा वाजता देशभरातील नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ही या बैठकीला रवाना झाले आहेत. मात्र, या संदर्भात अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.
मुंबई अध्यक्ष पदासाठी भाई जगताप यांचे नाव आघाडीवर -
मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून मुंबई काँग्रेसमध्ये काही बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. माजी खासदार संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्या कलगीतुऱ्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण होते. मात्र, एकनाथ गायकवाड यांच्या गळ्यात नेतृत्वाची माळ टाकून काही प्रमाणात हा वाद मिटवण्याचा प्रयत्न पक्ष श्रेष्ठींनी केला. आता काँग्रेस राज्याच्या सत्तेत असून या दृष्टीने पक्ष वाढीसाठी नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज दबक्या आवाजात व्यक्त करण्यात येत आहे. त्या दृष्टीने दिल्लीत मुंबई अध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरु झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
गायकवाड यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रारी -
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील दिल्लीत या संदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान अध्यक्ष गायकवाड सक्रिय नसल्याचा आरोप एका गटाने केला आहे. तर दुसऱ्या गटाने गायकवाड यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रारी केल्या आहेत. गायकवाड यांचे वाढते वय लक्षात घेता पक्षात सर्वसमावेशक नेतृत्व द्यावे, असाही सूर मुंबई काँग्रेसमध्ये आहे.
अमरजितसिंह मनहास यांच्या नावाचीही चर्चा -
दरम्यान या संदर्भात स्थानिक नेते उघड बोलायला तयार नाहीत. आमदार भाई जगताप आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी तसेच अमरजितसिंह मनहास यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. मात्र, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य राहिलेले भाई जगताप यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन : कोरोना काळात भारतातील स्थलांतरितांचे प्रश्न