मुंबई - मुंबईमध्ये वारंवार आगीच्या घटना घडतात. त्यात अनेकवेळा अवैध गॅस सिलेंडरच्या साठ्यामुळे आगी लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यासाठी अवैधपणे गॅस सिलेंडर, ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्या ठिकाणांवर माझ्या नेतृत्वात संपूर्ण मुंबईत संयुक्त पथकामार्फत लवकरच धाड टाकणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
आढाव बैठक -
वर्सोवा यारी रोड येथील एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला तसेच गोवंडी मंडाळा येथे आग लागल्यानंतर संपूर्ण मुंबईत कारवाई करण्यापूर्वी संबंधित यंत्रणांची बैठक घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले होते. त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी महापौर बोलत होत्या. या बैठकीला मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई शहरचे अप्पर जिल्हाधिकारी अरुण अभंग, पश्चिम उपनगरचे अप्पर जिल्हाधिकारी उद्धव घुगे, पूर्व उपनगरचे अप्पर जिल्हाधिकारी तेजूसिंग पवार, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे, पोलीस उपायुक्त चैतन्य एस., अग्निशमन अधिकारी हेमंत परब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापौर धाडी घालणार -
मुंबईमध्ये आग लागल्यानंतर जागा जिल्हाधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या अखत्यारीत आहे. असे सांगून अवैध ठिकाणांवर कारवाई होत नसल्याचे संबंधित यंत्रणांच्या निर्देशनास आणून दिल्याचे महापौरांनी सांगितले. यामुळे अवैध माफिया मुंबईत अवैध सिलेंडरचा साठा तसेच ज्वलनशील पदार्थांचा साठा करतात. यामुळे आगीच्या दुर्घटनांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच आता जिल्हाधिकारी कार्यालय, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचा संबंधित विभाग तसेच पोलीस यांचे संयुक्त पथक नेमून माझ्या नेतृत्वात संपूर्ण मुंबईत अवैध साठा असलेल्या ठिकाणांवर धाड टाकणार असल्याचे महापौर म्हणाले. जोपर्यंत अवैध माफियांवर कारवाईचा धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत ही कारवाई करण्यात येणार असून त्यानंतर संयुक्त पथकाद्वारे वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आजच्या बैठकीच्या अनुषंगाने "प्रमाणित कार्यपद्धती" लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा- भिवंडीत कोविडची दुसरी लस घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू ?