मुंबई- शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर आणि त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून गाड्या दिल्या जातात. त्यापैकी कुटुंबीयांना मिळणारी गाडी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाकारली आहे. त्या गाडीवर होणारा खर्च महापौर निधीमध्ये जमा करावा अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. महापौर निधीला मदत करणाऱ्या दात्यांना १०० टक्के करात सुट मिळावी, कचरामुक्त, खड्डेमुक्त रस्ते नागरिकांना मिळावे यासाठीही महापौरांनी सांगितले. पालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवला असल्याने मुंबईकरांनी आपल्या मुलांना पालिकेच्या शाळेत टाकावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर सुहास वाडकर यांचा मुंबई महापालिकेतील पत्रकार संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, माझे कुटुंब खूप लहान आहे. त्यांना गाड्यांची सवय नाही. माझे पती आणि मुलगा कामावर जाण्यासाठी गाडीचा वापर करत नाही. माझी स्वतःची गाडी आहे. त्यावरचा ड्रॉयव्हरही कित्तेक वर्षांपासून आहे. माझ्या कुटुंबीयांना वाहनाची आवश्यकता नसल्याने मी माझ्या कुटुंबाला दिलेली गाडी नाकारत असल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले. या गाडीवर होणार खर्च कमी करून तो खर्च महापौर निधीमध्ये वळता करावा जेणे करून महापौर निधीमध्ये वाढ करता येईल.
महापौर निधीमधून गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. महापौर निधीमध्ये कमी प्रमाणात निधी जमा आहे. हा निधी वाढवण्यासाठी महापौर रजनी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी किंवा आर्मी फंडला मदत करताना १०० टक्के इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. मात्र, महापौर निधीमध्ये मदत करणाऱ्याला ५० टक्के इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. यामुळे महापौर निधीला मदत करायला कोणीही पुढे येत नाही. महापौर निधीला मदत करणाऱ्यांना १०० टक्के सूट मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
पालिकेच्या शाळांमध्ये मुलांना शिकवा -
अनेक मुंबईकर हे कर्ज काढून, आपले दागिने विकून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवत असतात. त्यामागे आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा उद्देश असतो. मात्र, यामुळे आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष होते. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये प्रशासनाकडून चांगल्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. मी सुद्धा महापालिकेच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या मुलांना पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवावे असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. पालिका शाळांमध्ये चांगल्या सोयी सुविधा मिळतात का, त्यात कोणत्या त्रुटी आहेत याची पाहणी शाळांमध्ये जाऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.