मुंबई - बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ना. म. जोशी मार्ग चाळीतील 272 पात्र रहिवासी संक्रमण शिबिरात स्थलांतरीत झाले आहेत. या रहिवाशांना पुनर्वसित इमारतीत कुठे, कुठल्या मजल्यावर घर मिळणार हे निश्चित करण्यासाठी इमारत बांधण्याआधीच लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑक्टोबरपासून ही लॉटरी रखडली आहे. पण आता मात्र या लॉटरीला मुहूर्त लागला आहे. गुरुवारी (11 फेब्रु.) दुपारी 1 वाजता लॉटरी फुटणार आहे. लॉटरीची तयारी म्हाडाच्या मुंबई मंडळाने केली आहे. दरम्यान, याआधी दोनदा लॉटरीची तारीख जाहीर करत ऐन वेळी लॉटरी रद्द केली गेली आहे. त्यामुळे आता हा मुहूर्त पुन्हा रद्द होणार नाही ना अशी धाकधूक रहिवाशांमध्ये आहे.
29 ऑक्टोबरला होणार होती लॉटरी
वरळी, नायगाव आणि शिवडी चाळीचा पुनर्विकास म्हाडाकडून करण्यात येत आहे. पण चार वर्षे झाली पुनर्विकासाने वेग काही घेतलेला नाही. आता तर मागील एक वर्षांपासून काम ठप्पच आहे. एकूणच प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरात स्थलांतरीत झालेल्या रहिवाशांची चिंता वाढली आहे. पुनर्विकास होईल ना, आपल्याला संक्रमण शिबिरातच कायमस्वरूपी राहावे लागणार नाही ना असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते. त्यामुळेच हक्काच्या घराची खात्री देत त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काम पूर्ण होण्याआधीच लॉटरी काढावी, कुणाला कुठे घर मिळेल हे निश्चित करावे अशी मागणी या रहिवाशांची होती. ही मागणी राज्य सरकारने मंजूर करत तशी तरतूद केली. या तरतुदीप्रमाणे 269 घरांसाठी 29 ऑक्टोबरला लॉटरी काढण्याचे जाहीर केले. पण ही लॉटरी ऐन वेळी रद्द करण्यात आली. यासाठी कोणतेही ठोस कारण सरकार वा म्हाडाकडून देण्यात आले नाही. दरम्यान, याआधी ही एकदा लॉटरीची तारीख जाहीर करत ती रद्द करण्यात आली होती.
आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती
एकीकडे पुनर्विकास रखडला आहे तर दुसरीकडे लॉटरी विनाकारण रखडवली जात असल्याचे म्हणत ना. म. जोशी मार्ग चाळीतील रहिवाशांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. ही नाराजी लक्षात घेत म्हाडाने आता 272 घरांसाठी (३ घरे वाढली) अखेर 11 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित केला आहे. लॉटरीची तयारी सुरू केली आहे. आता निश्चितपणे लॉटरी पार पडेल असा दावाही मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे. दरम्यान, 11 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता लॉटरी होईल, असे आम्हाला कळवण्यात आले आहे. तर यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित असतील, असेही म्हाडाने कळवल्याचे कृष्णकांत नलगे, रहिवासी, ना. म. जोशी चाळ, बीडीडी यांनी सांगितले आहे. तर याआधीचा अनुभव पाहता ऐनवेळी लॉटरी रद्द होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.