मुंबई - मुंबई शहरात आणि उपनगरात होळीसंदर्भात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे प्रसिद्ध असणाऱ्या वरळी कोळीवाडा आणि वरळी बीडीडी चाळ येथील होळी रद्द करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी दोन ते चार जणांच्या उपस्थितीत छोटी होळी जाळण्यात येणार आहे.
साध्या पद्धतीने काही भागात होळी जाळण्यात आली-
मुंबईतील कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात येते. तर दुसरीकडे वरळी बीडीडी चाळ येथे भव्य होळी उभारण्यात येते. मात्र या ठिकाणच्या होळी देखील रद्द करण्यात आल्या आहेत. कोळीवाड्यासह अन्य भागात दरवर्षी उत्साह दिसून येतो. यंदा मात्र साध्या पद्धतीने काही भागात होळी जाळण्यात आली. कोळीवाड्यात एक दिवस आधी कोळी जाळण्यात येते. यंदा मात्र कोरोना व्हायरसचे गांभीर्य ओळखून मुंबईकर आवाहनाचे पालन करताना दिसत आहे.
बीडीडी चाळीतील भव्य होळी यंदा रद्द वरळीच्या बीडीडी चाळीमध्ये भव्य होळी उभारण्यात येते. या होळींची चर्चा सात समुद्रापार देखील होते. यावर्षी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता या ठिकाणच्या मंडळांनी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भव्य मोठ्या वीस ते पंचवीस फुटाच्या होळी या ठिकाणाचे आकर्षण असतात. दरवर्षी घडणाऱ्या वाईट गोष्टींचे विषय घेऊन त्याचे दहन होळीच्या माध्यमातून करण्यात येते. मुंबईमध्ये कोरोना बाधितांचा आकडाही वेगाने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं आहे. त्यातूनच होळी सणाबाबत मोठं प्रतिबंधात्मक पाऊल उचललं आहे.या निर्णयावरून विरोधकांची टीका -
राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमावलीवरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार आहे की मुस्लिम लीगचं? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारनं होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदू विरोध खपवून घेणार नाही. हिंदूनों जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबाच्या मानसिकतेचा धिक्कार,” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
हेही वाचा- एनआयएकडून सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर तपासणी सुरू