मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचा (आयडॉल) पदवीदान समारंभ बुधवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. राज्यात दूर व मुक्त अध्ययन सुरू करणारे मुंबई विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ असून, या संस्थेच्या वैशिष्ट्यांचा आदर्श इतर विद्यापीठांनी घ्यावा, सामंत यावेळी म्हणाले.
पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा..
आयडॉलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षात १८ हजार ३२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त १५ विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठात दूरस्थ शिक्षण प्रणालीतून ६४ हजार विद्यार्थी शिकत आहेत. सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शासनाच्या वतीने करण्यात येईल. यात दूरस्थ शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ ही योजना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही एक चळवळ निर्माण होण्यासाठी विद्यापीठांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, असेही सामंत यावेळी म्हणाले.
१८ हजार ३२१ विद्यार्थी झाले पदवीधर..
मुंबई विद्यापीठाच्या या पदवी वितरण समारंभात विविध शिक्षणक्रमातील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. आयडॉलच्या १८ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे.
शाखानिहाय पदवी प्राप्त विद्यार्थी संख्या -
- मानव्य विद्याशाखा - ४,७००
- वाणिज्य विद्याशाखा - १३,००३
- विज्ञान व तंत्रज्ञान - ३८८
- कौशल्यविकास विद्याशाखा - २३०
- एकूण - १८,३२१
उदय सामंत यांच्या हस्ते पदवी प्रदान..
या कार्यक्रमाला पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर, आयडॉल संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनी देखील आयडॉलमधून एम.ए.अभ्यासक्रमातून विद्यार्थी म्हणून पदवी प्राप्त केली. त्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
हेही वाचा : ईटीव्ही भारत विशेष : फडणवीस ते ठाकरे सरकार अन् क्लीन चिट ते राजीनामा व्हाया चौकशी