मुंबई - क्रुझ ड्रग्ज रॅकेट प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी (केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथक) च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकारकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत ट्विट करत सचिन सावंत यांनी मागणी केली.
एनसीबीच्या कारवाईवर सचिन सावंत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. NCB व भाजपमधील संगनमताची मविआ सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपाचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर "पोलीस" पाटी कशी? NCB ने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का? असे प्रश्न सचिन सावंत यांनी नवाब मलिक यांच्या आरोपानंतर उपस्थित केले आहेत. त्यामुळे एनसीबीने केलेल्या क्रूझ ड्रग्ज रॅकेटच्या विरोधात महाविकास आघाडी सरकार चौकशी करणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
नवाब मलिक यांचे एनसीबीवर गंभीर आरोप-
केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथक एनसीबी ने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट याला शनिवारी रात्री अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत 17 जणांना ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र एनसीबी ने क्रूजवर धाड टाकत केलेली ही कारवाई ही खोटी असून क्रूज वर एनसीबी ला ड्रग्स सापडलेच नाही. तसेच अरबाज आणि आर्यनला त्या रात्री एनसीबी च्या कार्यालयात घेऊन जाणारे दोन व्यक्ती हे एन सी बी चे अधिकारी नसून, त्यातील एक भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष पदावर असलेला मनीष भानुषाली तर दुसरी व्यक्ती के पी गोसावी नावाची होती असा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच या सर्व प्रकरणी एन सी बी ने तातडीने खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद करून घेत केली आहे.