मुंबई - राज्यात शिवसेना भाजपाचे युती सरकार सत्तेवर असताना मुंबईत अनेक ठिकाणी उड्डाणपूल आणि स्कायवॉक बांधले. वांद्रे पूर्व ते वांद्रे न्यायालय आणि कलानगरपर्यंत मुंबईमधील पहिला स्कायवॉक बांधण्यात आला होता. मात्र हा स्कायवॉक जुना झाल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. हा स्कायवॉक पाडून त्याजागी नवा स्कायवॉक बांधला जाणार आहे. पालिकेने त्यासाठी निविदा काढल्या असून त्यासाठी १८ कोटी रुपये खर्च येणार आहे.
मुंबईतील पहिला स्कायवॉक -
महापालिकेच्या ‘एच/पूर्व’ विभागामधील वांद्रे स्थानकापासून फॅमिली कोर्टपर्यंत हा स्कायवॉक २००७-०८ साली एमएमआरडीए मार्फत बांधण्यात आला होता व सन २०१५ मध्ये हा स्कायवॉक महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु त्यानंतर या स्कायवॉकचे स्थितीदर्शक व पुनः सर्वेक्षण व्ही.जे.टी.आय. या संस्थेमार्फत करण्यात आला. या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल स्टीलमध्ये बांधण्यात आल्याने खाडीलगतच्या खराब वातावरणामुळे गंजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे हा स्कायवॉक सन २०१९ पासून पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे या स्कायवॉकचे बांधकाम पाडून त्या जागी पुनर्बांधकाम करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. स्कायवॉक बांधल्यापासून त्याचा वापर कमी होत असल्याने याचा हेतू साध्य झाला नव्हता. कोट्यवधी रुपये खर्च करून एमएमआरडीएने बांधलेला हा स्कायवॉक केवळ प्रेमीयुगलांचा आणि गर्दुल्यांचा अड्डा बनला होता.
हे ही वाचा -सिंधुताईं सपकाळ यांची अपूर्ण इच्छा पुर्ण होणार ; मुख्यमंत्र्यांनी 'त्या' क्लिपची घेतली दखल
१८ कोटीचा येणार खर्च -
स्कायवॉक नव्याने बांधण्यासाठी महापालिकेच्या पूल विभागाने निविदा मागवली होती. या निविदेमध्ये एन.ए. कंस्ट्रक्शन कंपनीने विविध करांसह १८.६९ कोटी रुपयांमध्ये काम मिळवले आहे. कामांचे कार्यालयीन अंदाजपत्रक १६.२० कोटी रकमेचे तयार करण्यात आले होते, परंतु यामध्ये एन.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीने १५ टक्के कमी दर आकारुन १४ कोटी २५ लाख रुपयांसह विविध करांसह १८ कोटी ६९ लाख रुपयांमध्ये कंत्राट देण्यात आले आहे. या स्कायवॉकवर एस्केलेटर बसवण्यात येणार आहे. वांद्रे पूर्वेकडील फॅमिली कोर्ट, एसआरए कार्यालय आणि म्हाडा येथील कर्मचाऱ्यांना ये-जा करण्याकरिता सोयीचे होणार आहे. हे काम कार्यादेश दिल्यानंतर १८ महिन्यांत पूर्ण होईल, असेही पूल विभागाकडून सांगण्यात आले.