मुंबई - राज्य सरकारने राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. मुंबईत निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली असली तरी प्रवासासाठी सामान्य नागरिकांना लोकल अद्याप बंद आहे. मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी होत असली तरी एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्रातील रुग्णसंख्या किती आहे याचा विचार केला जात आहे. येत्या गुरुवारी मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील रुग्णांचा आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्यानंतर राज्य सरकार लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय घेणार घेईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट घसरला -
राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून राज्य सरकारने शिथिलता दिली आहे. यासाठी पाच स्तर तयार करण्यात आले असून त्यानुसार निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाते आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ वरून ४.४० टक्के झाल्याने सद्या मुंबईचा समावेश दुसऱ्या स्तरात झाला आहे. मात्र नियम तिस-या स्तरातीलच लागू आहेत. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरु करण्यासाठी कोरोना स्थितीचा अंदाज घेत आहे. मुंबईत नोकरीनिमित्त व इतर कारणासाठी मुंबईसह मुंबई शेजारील शहरांमधील येणा-या लोकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे लोकल सुरु करताना फक्त मुंबईच नाही, तर संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील कोरोना स्थितीचा विचार करावा लागणार आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी एमएमआर क्षेत्रातील मुंबईसह शेजारच्या ठाणे, नवीमुंबई विभागातील कोरोना रुग्णांचा आढावा घेतला जाणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट व इतर स्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
लोकलबाबतचा निर्णय गुरुवारनंतर -
मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. मात्र शेजारच्या शहरांची कोरोनाची स्थिती सद्या काय आहे, याचा आढावा गुरुवारी घेतला जाणार आहे. मुंबईसह शेजारच्या शहरांतील कोरोना स्थिती सुधारत आहे. त्यामुळे गुरुवारच्या आढाव्यानंतर यापूर्वीप्रमाणे सर्वसामान्यांना मर्यादित वेळेत लोकलमध्ये मुभा देण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.