मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान पाणी साचण्याच्या आणि रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार घडतात. मुंबईत नुकताच पाऊस पडून गेला आहे. त्यानंतर रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी पालिकेने खड्ड्यांच्या समस्या दूर करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. खड्ड्यांचा त्रास कमी करण्यासाठी 'खड्ड्यांची छायाचित्रे पाठवा 24 तासांत खड्डे बुजणार', अशी संकल्पना पालिकेकडून राबवली जाणार आहे. यासाठी पालिकेने मुंबईतील 24 विभागातील व्हाॅटसअॅप क्रमांक जाहीर केले आहेत.
रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनवण्यावर भर
मुंबईत दरवर्षी पावसाळा सुरु झाला की रस्ते खड्डेमय होतात. मुंबईकरांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो. यंदा पहिल्याच जोरदार पावसांत रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. कंत्राटदाराकडून वरवरची मलमपट्टी केली जात असल्याने रस्ते पहिल्याच पावसात खड्डेमय होतात. कंत्राटदारावर कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जात असतानाही रस्त्यावर खड्डे पडत असल्याने पालिका टीकेचे लक्ष्य ठरते. ही बाब लक्षात घेऊन रस्त्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात असल्याचे सांगण्यात आले. पालिकेने काही वर्षांपूर्वी रस्तेबांधणीसाठी थीन टॅपिंग या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईत दहाहून अधिक रस्ते बांधले आहेत. सुमारे दहा वर्षांनंतरही हे रस्ते उत्तम स्थितीत आहेत. यंदा पहिल्यांदाच रस्तेबांधणीच्या कामात प्लास्टिकचा वापर केला जातो आहे. तसेच जास्तीच जास्त रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनवण्यावर भर दिला जात आहे.
'येथे' करा खड्ड्यांबाबत तक्रारी
आपल्या विभागात खड्डे पडल्याचे आढळून आल्यास नागरिकांना पालिकेला @mybmc वर ट्वीट करता येईल किंवा mcgm.gov.in या वेबसाईटवर तक्रार करता येईल. तसेच MCGM 24×7 हे अॅपही सुरू करण्यात आले आहे. हे अॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी 1800221293 हा टोल फ्री क्रमांक आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : पोलीस कॅम्पमधील जीर्ण इमारतीच्या दुरुस्तीसाठी निघाली वर्क ऑर्डर