मुंबई - नायर रुग्णालयात आज अचानक मोठ्या संख्येने परिचारिका रस्त्यावर उतरल्या. रुग्णालयात कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी नर्सेसना जबाबदार धरत त्यांना वेठीस धरले जात आहे. वरिष्ठांकडून त्यांचा मानसिक छळ केला जात आहे, असा आरोप करत परिचारिकांनी आज दुपारी 1 च्या सुमारास डीन कार्यालयावर छापा टाकला. तर जोपर्यंत आम्हाला होणारा त्रास दूर करण्याबाबत डीन यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका या परिचारिकांनी घेतली आहे. दरम्यान व्यवस्थापनाशी बोलणे सुरू असून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनाच्या लढाईत नर्सेस देताहेत अविरत सेवा
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाकडून चांगले काम होत असून या कामाची दखल वेळोवेळी घेण्यात आली आहे. तर मागील वर्षभरापासून येथील परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर अविरत सेवा देत आहेत. त्यातही परिचारिका जीवाची बाजी लावत आठ तास रुग्णसेवा देत आहेत. मनुष्यबळ कमी असताना कामाचा ताण असतानाही सुमारे 500 परिचारिका आपले कर्तव्य निभावत आहेत. अशावेळी विविध पदावरील वरिष्ठांकडून आम्हाला त्रास दिला जात आहे, आमचा मानसिक छळ केला जात आहे. कुठल्याही गोष्टीसाठी मग ती चूक कुणाची ही असो त्याचे खापर आमच्यावर फोडत आम्हाला धारेवर धरले जात असल्याची माहिती एका परिचारिकेने 'ईटीव्ही भारत'ला नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. मागील कित्येक दिवसापासून हा त्रास सुरू असून आता पाणी नाकाच्या वर गेल्याने आम्ही रस्त्यावर उतरल्याचेही या परिचारिकेने सांगितले आहे.
नोडल ऑफिसरला हटवण्याची मागणी?
नायरमधील 50 ते 60 परिचारिकांनी डीन कार्यालयावर आज धकड दिली. आपल्याला वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचे म्हणत त्या रस्त्यावर उतरल्या. पण नायर रुग्णालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व रोष रुग्णालयाच्या एका नोडल ऑफिसरविरोधात असल्याचे समजते आहे. नोडल ऑफिसर परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांनाही विनाकारण त्रास देत असून त्यांच्यातही या ऑफिसरविरोधात रोष असल्याचे समजते आहे. तेव्हा या नोडल ऑफिसरला हटवण्याची परिचारिकांची मागणी असल्याचेही समजते आहे. पण याबाबत बोलणे त्यांनी टाळले आहे. याविषयी रुग्णालयाचे डीन डॉ रमेश भारमल यांना विचारले असता त्यांनी आपण बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर आलो असून या मोर्चाबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेत हे आंदोलन करण्यात येत आहे.