मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नंतर त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे हे देखील राजकारणात सक्रिय होणार का ? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झालेला आहे. आज तेजस ठाकरे यांचा वाढदिवस आहे, या निमित्त शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून तेजस यांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिल्या आहेत. या शुभेच्छानंतर पुन्हा एकदा तेजस यांच्या राजकीय प्रवेशावर चर्चा होऊ लागली आहे.
नार्वेकर यांनी सामनातून तेजस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस् यांची उपमा त्यांना दिली आहे. 'ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा', असा मजकूर सामनात देण्यात आला आहे.
याबाबत बोलताना मिलिंद नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे की तेजस सध्या तरी राजकारणात सक्रीय होणार नाही आहेत. राजकारणात प्रवेशाच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. तेजस हे आक्रमक आहेत म्हणून त्यांचा उल्लेख विवियन रिचर्ड्स असा केला आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील सुनील गावस्करप्रमाणे संयमी आहेत असेही नार्वेकर यांनी सांगितले.
मात्र, या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारण की युवासेनेचे प्रमुख पद आदित्य ठाकरे सोडणार आहेत. त्यांच्या जागी त्यांचे मावसभाऊ वरूण सरदेसाई यांचे नाव चर्चेत आहे. मात्र तेजस यांचं चर्चेत आलेले नाव काही संकेत तर देत नाही आहेत ना, अशी चर्चा होऊ लागली आहे
कोण आहे तेजस
तेजस ठाकरे यांचे शालेय शिक्षण माहीममधील बॉम्बे स्कॉटिश शाळेत झाले आहे. तर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये झाले आहे. वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांशी जोडले आहेत.
तोडफोड सेना
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या लाँचिगदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी तेजसचे कौतुक केलं होतं. “तेजसची तोडफोड सेना आहे, त्याची स्टाईल माझ्यासारखी, छंद माझ्याशी जुळते, वन्यजीवन त्याला आवडते,” असे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तेजस ठाकरे हे घरात आक्रमक असल्याने त्यांना बाळासाहेब ठाकरे ‘तोडफोड सेना’ म्हणाले होते.
हेही वाचा - सीएसएमटी, अमिताभ यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याची अफवा, जालन्याच्या दोघांना ठाण्यातून अटक