मुंबई - राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. मात्र कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर पोहचण्याचे संदेश मिळाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच इतरही अडचणी येत असल्याने, लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
ॲपमध्ये तांत्रिक अडचण
राज्यात सकाळी ११ वाजेनंतर लसीकरणाला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली, तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली होती. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले. केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असेही डॉ. व्यास यांनी यावेळी सांगितले. या लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीयस्तरावर शुभारंभ झाला, त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ पार पडला. राज्यात 285 केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभरात सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी
अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदूर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०)