मुंबई - नवीन शैक्षणिक सत्र व कामकाज कधी सुरू करावे ? याबाबतीत अजूनही शालेय शिक्षण विभागाने कोणता निर्णय घेतला नाही. अशा वेळी राज्यातील अनेक शाळा व्यवस्थापनाने सोमवारपासून शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षकांना दिले आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही, त्यामुळे शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
सोमवारपासून मुंबईतील अनेक शाळांचे कार्यालये आणि त्यांचे कामकाज सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांना कामावर हजर राहण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मुंबई आणि परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्वाचा भाग असलेली लोकल ट्रेन आणि मेट्रो, सुरू नाहीत. तसेच खासगी वाहने मिळणे कठीणच झाले. अशातच काही शाळांनी शिक्षण विभागाचे कोणतेही आदेश नसताना शिक्षकांना मेसेज करून ८ ते १५ जून दरम्यान शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु कोरोनामुळे मुलेच शाळेत येणार नसल्याने अध्यापन होणार नाही. इतर काही कामेही ऑनलाईन केली जात आहेत. त्यामुळे शाळांनी शिक्षकांना सोमवारपासून हजर राहण्याची सक्ती करू नये, अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.
अनेक शिक्षक मुंबई उपनगरात राहतात. तसेच मुंबईतील कोरोना संकट जास्त गंभीर असल्याने मूळ गावी गेले आहेत. गावातून येण्यास सरकारी वाहन उपलब्ध नाही. खासगी वाहने मुंबईत आणली जात नाहीत. कारण एकदा मुंबईत जाऊन आलेल्या व्यक्तीला किमान चौदा दिवस संस्थात्मक विलगिकरणात रहावे लागते. असे असतानाही अनेक शाळांनी आवश्यक नसतानाही शिक्षकांना उपस्थितीची सक्ती करण्यास सुरवात केली आहे. ती तातडीने थांबविण्यात यावी अशी मागणी परिषदेकडून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना करण्यात आली आहे.