मुंबई - मुंबई महानगरपालिकेत 104 टक्के नालेसफाईचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत नालेसफाईत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन या संबंधित सर्व पुरावे माध्यमांसमोर सादर केले. यावेळी साकीनाका येथील नालेसफाईचा व्हिडिओ दाखवत, नाल्यातील गाळ नाहीतर डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांनी केला आहे, असा आरोप त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे.
'वीरप्पन गॅंगवर कारवाई करण्याची हिंमत आयुक्तांनी दाखवावी' -
मनसेने कुर्ला सीएसटी रोड येथील व्हिडिओ माध्यमांना दाखवला. यामध्ये डंपरमध्ये डेब्रिज भरले जात असून वरच्या थरात गाळ टाकला जात आहे, अशा प्रकाराने डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांकडून केली जात आहे. गाळाचे वजन वाढवण्यासाठी कंत्राटदारांकडून हा प्रकार केला जात आहे. त्यामुळे आत्तापर्यंत नालेसफाईमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा मनसे केला आहे. मुंबई महानगरपालिकेत जे वीरप्पन गॅंग बसले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत महापौर यांनी दाखवावी. मुंबई महापालिकेत वीरप्पन गँगची चौकशी करा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे. संदीप देशपांडे यांच्या या गंभीर आरोपानंतर शिवसेना यावर काय प्रत्यूत्तर देणार, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, नाल्यातील गाळ काढण्यासाठी दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचे कंत्राट दिले जाते. यासंदर्भात राज्यातील काँग्रेस, भाजप आणि मनसे या तिन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधारी शिवसेनेवर आरोप केले आहेत.
हेही वाचा - रेवदंडाजवळ समुद्रात बुडाली बार्ज, 16 खलाशांना वाचवण्यात यश