मुंबई - गेली अडीच वर्षे कोरोना विषाणूचा ( Mumbai Corona ) प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असला तरी कोरोना अद्याप गेलेला नाही. कोरोनाचे रुग्ण आजही मुंबईमध्ये आढळून येत आहेत. गेल्या अडीच वर्षात मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या चार लाटा येऊन गेल्या. या चारही लाटा थोपवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. एकीकडे मुंबईकरांनी कोरोना विषाणूवर मात केली असताना आता लहान मुलांच्या हातावर, पायावर आणि तोंडावर फोड्या येऊ लागल्या आहेत. त्यांना ताप, सर्दी, खोकला यासारखे आजारही होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे लहान मुलांना रुग्णालयातील तसेच खासगी डॉक्टरांकडे नेण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार नेमका कोणता हे माहीत नसल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काय दिसत आहेत लक्षणे - लहान मुलांना सुरुवातीला ताप येत आहे. सर्दी खोकला यासारखे आजारही होत आहेत. त्याच सोबत दोन ते तीन दिवसांनी हातावर, पायावर आणि तोंडावर फोड्या येत आहेत. या फोड्यांमध्ये पाणी असल्याने हा आजर चिकन फॉक्स सारखा असल्याने काही पालक घरच्या घरी उपचार घेत आहेत. तर काही पालक आपल्या लहान मुलांना डॉक्टरांकडे नेवून उपचार करून घेत आहेत.
डॉक्टरांकडून उपचार करून घ्या - याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, यासाठी वेगळ्या काही गाईडलाईन नाहीत. पालकांनी मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. मुलांचे हात स्वच्छ ठेवावेत. खोकताना काळजी घ्यावी. लक्षणे असलेल्या मुलांना इतर मुलांपासून वेगळे ठेवावे. स्वतःहून कोणतीही औषधे देऊ नये. डॉक्टरांकडून किंवा पालिकेच्या रुग्णालयात, दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत असे आवाहन, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे( Health Officer Dr Mangala Gomare) यांनी केले आहे.
हॅन्ड, फूट, माऊथची साथ - सुरुवातीला ताप आणि हात पायावर फोडी येणे. त्यानंतर मोठ्या गाठी बनतात. सध्या मुंबईमध्ये हॅन्ड, फूट, माऊथची साथ सुरु आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे लोकांमध्ये भीती आहे. ही मंकीपॉक्सची लक्षणे नाहीत. असे लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास घरी उपचार न करता डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. मंकीपॉक्स या आजराचे रुग्ण विशेष करून युरोप मध्ये दिसून आले आहेत. राज्यात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नाही. आम्ही रोज ओपीडीमध्ये तपासणी करत आहोत. जर एखादा रुग्ण आढळून आला तर आमच्याकडे वॉर्ड तयार आहेत अशी माहिती जे जे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापले यांनी दिली.
हेही वाचा : BMC Street Tender : खड्डे मुक्त मुंबई; रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी पालिकेचे ५८०० कोटींचे कंत्राट