मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपातील माफीचा साक्षीदार निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जीवाला धोका असल्याने, त्यांना रोज-रोज मुंबई सत्र न्यायालयात सुनवणीसाठी हजर करता आणणे शक्य नसल्याचे, तलोजा प्रशासनाकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात सांगण्यात आले, असून कोर्टाने जेल प्रशासनाची विनंती मंजूर केली आहे.
आवश्यकता असेल त्यावेळी हजर करा - आरोपी सचिन वाझे यांनी विशेष न्यायालयातील एनआयए कोर्टामध्ये अर्ज केला होता की नियमित सुनावणी करिता कोर्टात आणण्याची निर्देश जेल प्रशासनाला देण्यात यावा त्यावर जेल प्रशासनाने असा दावा केला आहे की वाझे यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना नेहमीच मुलीला हजर करणे शक्य नाही. त्यावर विशेष न्यायालयानेही कारागृह प्रशासनाचे म्हणणे योग्य ठरवून वाझे यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्याचवेळी आवश्यकता असेल त्यावेळी वाझे यांना सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश देण्यात येतील असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयात हजर करण्यात येते - एनआयए कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयात वाझे यांनी अर्ज केला होता. तसेच त्यांना प्रकरणाच्या सुनावणीला हजर करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. आपल्याला कारागृहातील दूरसंवाद प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्स न्यायालयात हजर करण्यात येते. परंतु तांत्रिक कारणास्तव त्यात अडचणी येतात. परिणामी सुनावणीदरम्यान काय झाले हे आपल्याला समजू शकत नाही असा दावाही वाझे यांनी अर्जात केला होता.
दिलासा देण्यास नकार - सचिन वाझे हे एका प्रकरणात माफीचा साक्षीदार असल्याने त्यांच्या जीवाला धोका असून त्यांना नियमित सुनावणीसाठी आणणे शक्य नसल्याचे कारागृह प्रशासनाने यावर उत्तर दाखल करताना न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने कारागृह प्रशासनाचे म्हणणे मान्य केले व वाझे यांना दिलासा देण्यास नकार दिला.
वाझे यांनी केलेला अर्ज फेटाळला - आपल्याविरोधात विविध प्रकरणे दाखल आहेत. त्यामुळे कारागृहात वकिलांना भेटण्यासाठी मिळणारा दहा मिनिटांचा वेळ पुरेसा नसल्याचे वाझे यांनी अर्जात म्हटले आहे. याशिवाय आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला हलका आहार तुरुंग प्रशासनाकडून दिला जात नाही असा दावाही वाझे यांनी अर्जात केला होता. त्यावर तळोजा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने सादर केलेले म्हणणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी विचारात घेतले. या अहवालात जेजे रूग्णालयाने वाझे यांना हलका आहार घेण्याचा सल्ला दिल्याने त्यांना जेवणात वरण, भात आणि पाव दिला जात असल्याचे नमूद केले आहे. शिवाय वाझे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचेही मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने म्हटले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने वाझे यांनी केलेला अर्ज फेटाळला.
वाझे यांना हिरवा कंदील - वाझे हे सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी अटकेत आहे. याशिवाय वाझे हे भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि ख्वाजा युनुस कथिक कोठडी मृत्यू प्रकरणातही आरोपी आहेत. देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणात वाझे माफीचा साक्षीदार आहे. याशिवाय देशमुखांविरोधातील आर्थिक गैरवयवहार प्रकरणातही ईडी माफीचा साक्षीदार होण्यास वाझे यांना हिरवा कंदील दाखवला आहे. न्यायालयात या अर्जावर 18 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
हेही वाचा - भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत...; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका