मुंबई- अँटिलिया बाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेला अटक केल्यानंतर 90 दिवसात एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. याचाचा आधार घेत वाझेने आता जामिनासाठी अर्ज केला आहे.
मुंबई पोलीस दलातून बडतर्फ-
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टीलिया इमारतीच्या बाहेर काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला क्राईम ब्रँचचा पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी वाझेला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मुंबई पोलीस आयुक्तांकडून सचिन वाझे या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून घटनेच्या 311 (2)( ब )या कलमानुसार वाझे बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे.
एनआयएसह ईडीकडून चौकशी सुरू-
गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे यांची एनआयएकडून अँटिलिया बाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यापाठोपाठ नुकतीच एनआयएनं ईडीला देखील सचिन वाझे यांच्या चौकशीची परवानगी दिली आहे. परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीने सचिन वाझेची चौकशी केली आहे.
सचिन वाझेने मुंबईतून जवळपास सव्वातीन कोटी वसूल केले
सचिन वाझेनं मुंबईतील झोन 1 ते 7 मधून जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात 1 कोटी 64 लाख रुपयांची वसूली बारमधून केली. तर झोन 8 ते 12 मधून 2 कोटी 66 लाख रुपयांची वसुली केली. ही वसुली बार मालकांना एक्ट्रा परवानगी मिळण्यासाठी केली जात होती,असे ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. आता अँटिलिया बाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
सचिन वाझेना जामीन मिळणे अशक्य - धांडोरे
अँटिलिया कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझेने एनआयए विशेष कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. मात्र त्याने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला जामीन मिळणे अशक्य असल्याचे मत वकील नितीन धांडोरे यांनी व्यक्त केला आहे.