मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली लोकलसेवा पूर्वपदावर येत असताना आता सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी पूर्ण झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र, या प्रवासादरम्यान कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच निर्धारित वेळेतच प्रवास करता येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
दुपारी 12 ते 4 या वेळेत प्रवास -
सोमवारपासून सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलसेवा सुरू होणार आहे. सामान्यांसाठी निर्धारित वेळेत हा प्रवास करता येणार आहे. पहाटे पहिल्या लोकल पासून सकाळी सात वाजेपर्यंत सकाळच्या वेळेत हा प्रवास सर्वसामान्य प्रवाशांना करता येणार आहे. तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत प्रवास करता येइल. तर रात्री 9 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पूर्ण नसला तरी काही प्रमाणात या निर्णयाचा मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. टप्याटप्याने लोकल सेवा सुरू केली जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री यांनी आधीच दिले होते. अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांच्यासाठी लोकल सेवा सुरू होती. त्यानंतर महिलांसाठी निर्धारित वेळेत ही सेवा देण्यात आली. आणि आता सर्वसामान्य लोकांसाठी ही सुविधा दिल्याने पूर्ण नसला तरी काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळाला असल्याचेही काकाणी यावेळी म्हणाले आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्यासाठी ठरावीक वेळा निर्धारीत करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील गर्दी होऊ नये यासाठी देखील काळजी घेण्याची गरज असल्याचे मत काकाणी यांनी व्यक्त केले आहे.