मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना जाहीर मदत केली होती. या मदतीची परतफेड राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत करणार आहे. युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार देवू नये यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याचे समजते. त्याचबरोबर शरद पवारांचीही राऊत यांनी भेट घेतली होती.
हेही वाचा - लातूरकरांच्या आठवणीतली 'मामुली' निवडणूक; विलासरावांनाही पत्करावा लागला होता पराभव
सुप्रिया सुळे यांनी २००९ साली लोकसभेची पहिली निवडणूक बारामती मतदारसंघातून लढवली होती. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. सुप्रियाला लहानाची मोठी होताना पाहिली आहे. त्यामुळे ती लोकसभेत गेलेली पहायला आवडेल, असे सांगत सेनेने उमेदवार दिला नव्हता. आता शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीने आपला उमेदवार उतरवू नये, यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. तसे झाल्यास आदित्य यांच्यासाठी ही निवडणूक सोपी जावू शकते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुप्रिया सुळेंची गुप्त भेट घेतल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. वरळीत राष्ट्रवादीने उमेदवार देऊ नये अशी विनंती राऊत यांनी सुप्रियांना केली आहे. सुप्रिया सुळे याही शिवसेनेने केलेल्य़ा जुन्या मदतीची परतफेड करण्यास तयार असल्याचे समजते. त्यामुळे वरळीत राष्ट्रवादी उमेदवार देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - पृथ्वीराज चव्हाणांना का लढवावी वाटत नाही लोकसभा निवडणूक?