मुंबई - अँटिलिया स्फोटक प्रकरणाशी संबंधित स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू संदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. ज्यावेळी मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्यापूर्वीच त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला होता. मुंबई पोलीस दलातील इन्स्पेक्टर सुनील माने यांनी मनसुख यांचा मोबाईल घेऊन तो बंद केला होता, अशी माहिती एनआयएने बुधवारी न्यायालयात दिली.
मानेंनी स्वतःचा व मनसुखचा मोबाईल ठेवला बंद
एनआयएने बुधवारी इन्स्पेक्टर सुनील माने यांना न्यायालयात हजर केले असता, एनआयएने सांगितले की सुनील माने 4 मार्च रोजी संध्याकाळी आपल्या कार्यालयात नव्हते, तर मनसुखची हत्या झाली तेव्हा ठाण्यात गेले होते.
एनआयएच्या वकिलाने न्यायालयास सांगितले की 4 मार्च रोजी सुनील माने यांनी आपला मोबाइल बंद केला आणि तो आपल्या बॅगमध्ये ठेवला होता. तसेच ती बॅग त्याच्या कार्यालयात म्हणजे कांदिवलीच्या गुन्हे शाखेत ठेवली होती. यानंतर त्यांनी आपल्या एका सहकाऱ्यास ती बॅग आपल्या घरी घेऊन जाण्यास सांगितले होते.
मनसुखचा मोबाईल सुनील मानेनी घेतला
माने पुन्हा कळवा येथे गेले असता, सचिन वाझे यांनी मानेला त्यांच्या गाडीत बसवले. त्यानंतर दोघे जण मुंब्राकडे निघाले आणि जाताना मनसुखलाही त्यांच्या गाडीत घेऊन गेले. मनसुखचा मोबाईल सुनील माने यांनी ताब्यात घेतला होता आणि त्याने तो ताबडतोब बंद केला, जेणेकरुन त्याला कोठे नेले जात आहे, हे कळले नसते.
त्यानंतर सुनील माने वसई येथे आले, जिथे तो मनसुखचा मोबाईल फोन सुरू केला, जेणेकरून भविष्यात जेव्हा मनसुखच्या हत्येचा तपास केला जाईल तेव्हा तपास करणार्यांना मनसूख वसईत सापडले किंवा मनसुख सापडला नाही या दृष्टीने तपास करतील.
एनआयएने म्हटले आहे की, या प्रकरणात त्यांना पुढील चौकशी करावी लागेल, सुनील माने यांना पुढील माहिती विचारली पाहिजे, या मागणीनंतर न्यायालयाने सुनील माने यांना १ मे पर्यंत एनआयएच्या ताब्यात पाठवले.