मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच. एल. रिलायन्स रुग्णालयातून देण्यात आली आहे. ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे एक तास ही शस्त्रक्रियेची प्रक्रिया चालली. अशी माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे.
त्रास बळावल्याने मानेवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला
उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत होता. हा त्रास बळावल्याने त्यांना मानेवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक संपताच मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाले होते.
मान आणि खांद्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया
शस्त्रक्रिया न करता हे दुखणे बरे होईल या आशेने प्रयत्न सुरू होते. मात्र, तसे झाले नाही. मानदुखी थांबत नव्हती. त्यानंतर डॉक्टरांनी ठाकरे यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे मान आणि खांद्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.