मुंबई - आर्थिक गुन्हे गैरव्यवहार प्रकरणात (Money Laundering Case) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक करण्यात आल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून ते आर्थर रोड जेलमध्ये आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांना देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करून दोन आठवड्यांत अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
वाढत्या वयामुळे देशमुखांना जामीन देण्याची विनंती - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली. पीएमएलए न्यायालयाने 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानिर्णयाला देशमुखांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. आरोग्याच्या कारणास्तव तसेच त्यांचे वाढते वय पाहता जामीन देण्याची विनंती करण्यात आली. देशमुख ७३ वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळला आहे आणि उच्च रक्तदाब यासह विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. त्यांना सतत आधार आणि मदतीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे देशमुखांना जामिनावर सोडण्याची विनंती वकिलांनी केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली.
देशमुखांच्या वकिलांचा युक्तिवाद - देशमुखांची वैद्यकीय अवस्था पाहता त्यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती त्यांच्यावतीने अॅड. अनिकेत निकम यांनी न्यायालयाकडे केली. तेव्हा याआधीच न्यायालयात अनेक खटले प्रलंबित अथवा न्यायप्रविष्ट असताना त्यांना डावलून देशमुखांचा अर्ज तातडीने सुनावणीसाठी घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्या कारणांसाठी तातडीचा वैद्यकीय जामीन पाहिजे त्याची माहिती सविस्तर प्रतिज्ञापत्रातून मांडा, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती प्रभूदेसाई यांनी निकम यांची विनंती फेटाळून लावली.
ईडीकडे बरेच पुरावे - अनिल देशमुख हेच या कटामागचे 'lमास्टर माईंड असून भ्रष्टाचारातून मिळवलेल्या वारेमाप संपत्ती मागचे मुख्य स्त्रोत काय? त्याबाबत देशमुखांना स्पष्टीकरण देता आलेले नाही, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने देशमुखांच्या जामीन अर्जाला विरोध करत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. तर देशमुखांनी दाखल केलेल्या अर्जावरील प्रत्येक मुद्यावर बाजू मांडण्यासाठी ईडीकडे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे जेव्हा सुनावणी होईल त्यावेळी योग्य पद्धतीने आपली बाजू भक्कमपणे सादर करू, असेही ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे देशमुखांना सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटक केली असून, 11 एप्रिलपर्यंत देशमुखांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.