मुंबई - कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी घरातल्या स्वच्छ कापडांपासूनही मास्क बनवता येऊ शकतो, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्या आवाहनानंतर सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घरातच कापडी मास्क बनवले आहेत.
कोरोनामुळे संचारबंदी असली तरी डी. एस. हायस्कूल सोशल मीडिया तसंच ई-लर्निंग तंत्रज्ञानाचा अवलंब करुन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे तसंच कला साक्षरतेचे विविध उपक्रम राबवत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कला साक्षरता तसंच दृष्य कला भान विकसित करण्यासाठी कार्यरत असलेल्या 'चित्रपतंग कलासमूहा'ने विद्यार्थ्यांना घरातल्या कापडापासून मास्क बनवण्याचा गृहपाठ दिला होता.
"विद्यार्थ्यांनी रुमालापासून तसंच कापडाच्या तुकड्यांपासून स्वत:साठी मास्क बनवले. विशेष म्हणजे, या मास्कवर विद्यार्थ्यांनी चित्र काढून, त्यावर सामाजिक संदेश लिहून ते मास्क अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला", अशी माहिती चित्रपतंगच्या संचालिका प्राची श्रीनिवासन यांनी दिली.