मुंबई - महानगरक्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया रविवारी, २६ जुलैपासून होत आहे. ही नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्जातील पहिला भाग हा १ ऑगस्टपासून भरता येणार आहे. यासाठीचे सुधारीत वेळापत्रक आज शिक्षण विभागाने जारी केले आहे.
कोरोना आणि त्यापार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दहावीच्या निकालाला उशिर झाला असल्याने अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाही उशिराने सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीचे वेळापत्रक तिसऱ्यांदा बदल्यात आले असल्याची माहिती आज माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
राज्यात अकरावीचे ऑनलाईन प्रवेश हे मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात केले जात असून त्यांना बदलण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी यापूर्वी, प्रवेश अर्जाचा भाग १ विद्यार्थ्यांना २६ जुलैपासून भरता येणार होता, त्यात आता नव्याने बदल करण्यात आला असल्याने १ ऑगस्टरोजी ही माहिती भरावी लागणार आहे.
हेही वाचा - मराठमोळे जिल्हाधिकारी बिहारमधील पूरग्रस्तांच्या मदतीला; पुरात वाहून चाललेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण
असा भरावा लागणार ऑनलाईन अर्ज...
अकरावीच्या या सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना रविवारी, २६ जुलै सकाळी अकरा वाजतापासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी मिळवून, पासवर्ड तयार करावा लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतील भाग १ विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपासून भरत येणार आहे. अर्ज भरुन झाल्यावर शुल्क भरायचे आणि अर्ज लॉक करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. त्यासोबत विद्यार्थ्याने अर्जात भरलेली माहिती माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित करावी लागणार आहे. या प्रक्रियेत विद्यार्थी आणि पालकांना दूरध्वनीवरून माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राची मदत घेता येईल.
दहावीच्या निकालानंतर पुढील वेळापत्रक...
कनिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग एक भरुन, तो प्रमाणित केल्यानंतर भाग दोन भरायचा आहे. या भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने आवडीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरायचे आहेत. या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक; तसेच प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जाहीर केले जाणार आहे.
प्रवेशासाठी व्यापकस्तरावर जनजागृती करण्याची गरज...
अकरावी प्रवेशासाठी आपल्याकडे असलेल्या जागांची माहिती देण्यासाठी अनेक महाविद्यालयांनी वेळ लावल्याने शिक्षण विभागाला तिसऱ्यांदा आपले हे वेळापत्रक बदलावे लागले. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन करण्यात आलेला बदल आणि त्याची माहिती ही विद्यार्थी, पालकांना देण्यासाठी शिक्षण विभागाकडून व्यापकस्तरावर जनजागृती केली जाणार असल्याचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.