मुंबई : सामान्यांच्या प्रश्नांविषयी आग्रही भूमिका घेत आक्रमकरित्या सामोरे जावून त्या प्रश्नाला भिडण्याची वृत्ती असलेले, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तायरी असलेले राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याकडून जाणून घेऊया विविध प्रश्नांबाबत त्यांची आणि भाजपाची भूमिका..
प्रश्न - तु्म्ही रस्त्यावर उतरता, लोकांच्या आंदोलनामध्ये सहभागी होता. रस्त्यावरची लढाई तुम्हाला आवडते का? भावते का?
प्रविण दरेकर - रस्त्यावरची लढाई कोणाला आवडत नसते. परंतु न्याय मागण्यासाठी करावे लागते. तुम्हाला सरळ मार्गाने न्याय मिळत नसेल तर तुमच्यासमोर त्याशिवाय पर्याय नसतो. समाजाच्या, व्यक्तीच्या हितासाठी आंदोलन करावे लागणारच. मी जिथून आलोय तिथून संघर्ष, लढाई याचा वारसा घेऊनच आलोय.
प्रश्न - खासदार संजय राऊत यांनी नुकतंच विधान केलंय की, भाजपचे हिंदुत्व फेक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे का? काय फरक आहे? हिंदूत्वाची व्याख्या काय आहे?
प्रविण दरेकर - हिंदुत्व तेच आहे पण आपण त्या हिंदुत्वाची प्रतारणा करतो आहोत. हिंदुत्वाला समर्थनीय भूमिका कोण घेतो हे महत्त्वाचे. शिवसेनेचे की आणखी कोणाचे हिंदुत्व असली-नकली ते जनतेला बरोबर माहीत आहे. आदरणीय बाळासाहेबांच्या बाबतीत हिंदुह्रदयसम्राट म्हणून जनतेने बिरुदावली दिलीय. तेव्हा तत्कालीन शिवसेनेत असताना पार्ल्याची डॉक्टर रमेश प्रभूंची निवडणूक हिंदुत्वावर लढवली गेली. नंतर ते कोर्टात बाद झाली. बाबरी मशीद पडल्यानंतर जर शिवसैनिकांनी तोडली असेल तर मला अभिमान आहे हे सांगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. आता शिवसेनेची भूमिका राहिली आहे का, अमरावतीच्या त्या ठिकाणी हिंसाचार झाला
हिंदू बांधवांवर दुकानांवर त्या ठिकाणी आक्रमण झालं. त्या ठिकाणी हिंसाचार झाला त्यावेळी या काळात त्यांनी पळ का काढला?
प्रश्न - अमरावतीच्या हिंसाचारात भाजपचा हात होता अशा पद्धतीचा आरोप होतो, याबाबत तुमची प्रतिक्रिया काय?
प्रविण दरेकर - भारतीय जनता पार्टीचा हात असा नव्हता, कारण सर्व गुण्यागोविंदाने सर्व समाजाने एकत्र नांदावे अशीच आमची भूमिका आहे. परंतु त्रिपुराची घटना झाल्यावर दुसऱ्या दिवशी कोण काय बोलले. त्या ठिकाणी तोडफोड कोणी सुरू केली?हिंदू समाज रस्त्यावर उतरला म्हणून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आाला. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्षणासाठी उतरले होते. आपल्यावरील हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असतील तर त्यात काही गैर नाही.
प्रश्न - हिंसाचाराचे तुम्ही समर्थन करता का?
प्रविण दरेकर - समर्थन करत नाही. मात्र अशा पद्धतीने जर हल्ले होणार असतील त्याला उत्तरही त्याच पद्धतीने दिले जाईल.
प्रश्न - भाजपने एसटीचे आंदोलन पेटवले, त्याला हवा दिली. असे आरोप तुमच्यावर होत आहेत.
प्रविण दरेकर - मला वाटते एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना या काही आमच्या नाहीत. त्यांचे नेतेही आमच्याशी संबंधित नाहीत. त्या ठिकाणी असणारे कर्मचारी काही सगळे भाजपचे नाही. पण त्या कर्मचाऱ्यांना न्य्याय मिळावा, त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही त्यांना पाठींबा दिला. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की, आंदोलन कुठल्या नेत्याचे नाही, पक्षाचे नाही. गोपीचंद पडळकर आमचे आमदार आहेत. पण कर्मचाऱ्यांसाठी ते लढत आहेत. कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पार्टीने मदत केली. सर्वच पक्षांनी त्यांना मदत करावी आणि त्याचा प्रश्न निकाली काढावा.
प्रश्न - सरकारच्या गेल्या दोन वर्षांतील कामाकडे तुम्ही कसे बघता? कोरोना, वादळ या सगळ्याला राज्य सरकारने योग्य मदत केली असे तुम्हाला वाटते का?
प्रविण दरेकर - गेल्या दीड वर्षांचा काळ हा कोरोनाचा काळ होता. त्यामुळे पाहिजे त्या पद्धतीने राज्याचा विकास होऊ शकला नाही, हे मी समजू शकतो. पण असे असतानाही देश मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने चालवला. सर्वांना ज्या पद्धतीने मदत केली, आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला, वेगळे पॅकेज दिले गेले. व्यवसाय व्यवस्थित व्हावा म्हणून प्रयत्न केले. तसे पयत्न राज्य सरकारने का नाही केले? राज्यात काही चांगले झालेच नाही तर काय सांगणार? काही चांगलं नाही. योग्य अयोग्य ठरवण्यासाठी आधी काहीतरी व्हायला पाहिजे. काही झाले तर सांगणार ना योग्य आहे की नाही ते. काहीच होत नाही मागच्या कामांना स्थगिती दिलेली आहे. काही रद्द केलेत. पण हे नवीन कामे घेत नाही. त्यामुळे यात काय चांगलं आहे वाईट आहे हे तरी मला सांगा.
प्रश्न - नागपूरला अधिवेशन व्हावे का? आपले काय मत आहे?
प्रविण दरेकर - नागपूरला अधिवेशन झाले पाहिजे. तसा नियमच आहे. नागपुरात अधिवेशन ठेवल्याने नागपूरच्या समस्या सुटतात. प्रशासन यंत्रणा कामाला लागते. नागपुरात अधिवेशन असल्यामुळे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होते. प्रत्येक विभागाला वाटतं आमच्या विभागाच्या प्रश्नांना न्याय मिळावा. म्हणून नागपूर अधिवेशन नागपूरातच होणे गरजेचे आहे.
प्रश्न - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत तुम्हाला मुंबई महानगरपालिकेत पूर्णतःयश मिळेल का?
प्रविण दरेकर - भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडणुका ओरिएंटेड नाही. एखादा विषय आला म्हणून तेवढ्यापुरता काम करणारा हा पक्ष नाही. तर सदासर्वकाळ पक्ष कार्यरत असतो. मग सेवाकार्य असेल, आंदोलन, निवडणुका असतील. अशी पक्षाची वाटचाल सुरू असते. त्याच्या त्या वेळेपुरते ते काम नसतं.
प्रश्न - राज्य अस्थिर करण्यासाठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून दबाव टाकत आहे, असा आरोप आपल्यावर केला जातो आहे.
प्रविण दरेकर - हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. निराधार आहे. बिनबुडाचा आहे. अशा प्रकारचे आरोप करणे चूक आहे. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करीत असतात. एखाद्याचे चुकत असेल तर कसे माफ करणार. हे केवळ आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. उद्या मी पण बिनबुडाचे आरोप करायचे ठरवले, तर कोणावरही आरोप करू शकतो. त्याला काय लागते?
प्रश्न - अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून कोणते मुद्दै मांडणार?
प्रविण दरेकर - मुद्दे एवढे प्रचंड आहेत की काय बोलणार? राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. सत्तेचा दुरुपयोग होतोय. विकास काम सगळे ठप्प आहे. आज हिंदुत्व अडचणीत आहे. त्याला दाबण्याचा प्रयत्न काही जातीयवादी शक्ती डोकं वर काढू पाहत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. महिलांवर बलात्कार अत्याचार होत आहेत. शिक्षणाचा खेळखंडोबा त्या ठिकाणी झाला आहे. परीक्षा होते त्याच्या मध्ये काय घोळ आहे ते आपण पहाता आहात. समाधान संतोष राज्यात दिसत नाही. लोक अत्यंत अस्वस्थ आहेत. दोन वर्षात लोकांनी खूप सोसलेले आहे.