मुंबई - राज्यातील ग्रामीण भागात खेडोपाडी अविरतपणे सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसची दूरवस्था झाली आहे. दिवसाला 22 कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न घेणारी एसटी बस सद्यपरिस्थितीत फक्त 22 लाखांचे उत्पन्न घेत आहे.
लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला. सुरुवातीला लॉकडाऊन कालावधीत राजस्थानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपासून ते स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत मोफत सुखरूप पोहोचवण्याचे काम एसटीने केले. त्यानंतरही मुंबई, ठाणे, पालघर परिसरात राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रवास परिवहनच्या बसने होत आहे.
अकलॉक-१.० पासून राज्यात काही प्रमाणात महामारीच्या कायद्यात शिथिलता देण्यात आली. मात्र, अद्याप एसटी महामंडळाची चाकं आर्थिक कचाट्यातच रुतली आहेत. यातून एसटीला आर्थिक उभारी मिळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदाच कोकणातून आंब्याच्या पेट्यांची वाहतूक सुरू करण्यात आली. आता ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे.
लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या एसटी बसचे प्रतिदिन उत्पन्न जवळपास 22 कोटी रुपये होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही काळाने जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू झाली. मात्र, त्याला नागरिकांचा जास्त प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर 22 लाख रुपयांचे प्रतिदिन झाले. रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी 20 लाखांचे उत्पन्न मिळते.
एसटीला उभारी मिळण्यासाठी मालवाहतुकीच्या 350 बससेवा सुरू असून त्यातून एसटीला 10 ते 11 लाख रुपये प्रतिदिन उत्पन्न येते. सध्या एसटी महामंडळात 18 हजार 500 बस गाड्यांचा ताफा आहेत. त्यातील मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह एकूण 1700 बसेस सुरू आहेत.
एसटी महामंडळाकडे 1 लाख 4 हजार कर्मचारी असून प्रत्येक महिन्याला वेतनासाठी 290 कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने नुकतीच स्वेच्छानिवृत्ती योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेमुळे महामंडळाचे दरमहा 100 कोटी रुपये वेतन खर्चापोटी बचत होईल.