मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण (ST Corporation Merger) करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यापासून संप सुरु आहे. आझाद मैदानात कर्मचारी (ST Workers agitations) आपल्या कुटूंबीयांसह ठाण मांडून बसले आहेत. मात्र तोडगा निघताना दिसत नाही. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची जोरदार कारवाई केली जात आहे. आज (शनिवारी) राेजंदारीवरील ३८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. तर १६१ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. आतापर्यंत महामंडळाकडून २ हजार ९३७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
संपात ८४ हजार कर्मचारी सहभागी
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीच्या राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे न्यायालयाने सुद्धा संप करण्यास नकार दिला. प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून राज्यातील खासगी बस संघटनाना राज्यातील विविध स्टँडवरून खासगी बस गाड्या सोडण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय एसटी महामंडळाने कामगारांना कर्तव्यावर हजर होण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरी सुद्धा कर्मचारी कामावर हजर होत नव्हते. शेवटी एसटी कर्मचाऱ्यांचे संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली. या कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. आज राज्यभरात सात हजार ३१५ कर्मचारी कामावर हजर झालेत तर ८४ हजार ९५१ कर्मचारी संपात सहभागी आहेत.
२ हजार ९३७ कर्मचारी निलंबित
संपात सहभागी होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली असून, ९ नोव्हेंबरपासून आतापर्यंत २ हजार ९३७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महामंडळाने आज राेजंदारीवरील ३८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन व नियमाप्रमाणे एक महिन्याचे वेतनाचा धनादेश देऊन दाेन दिवसात ६१८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्या. आज १६१ जणांना निलंबित केले. शनिवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात १४३ एसटी धावल्या. त्यातून ४ हजार २८० प्रवाशांना प्रवास केला. यामध्ये ४६ शिवनेरी, ८३ शिवशाही तर १४ साध्या बसचा समावेश आहे.