मुंबई - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने खेळातील सर्वोच्च पुरस्कार 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' दिला जात होता. मात्र तो पुरस्कार आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' या नावाने दिला जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने लगेच आयटी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याचे जाहीर करून केंद्र सरकारला जशास तसे उत्तर दिले असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार'चे नाव बदलून 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' ठेवले असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयावर काँग्रेस नेत्यांकडून टीका करण्यात आली. पण आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना दिवंगत राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार देण्याबाबत शासन निर्णय देखील राज्य सरकारने जारी केलेला आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना देशांमध्ये माहिती प्रसारण तंत्रज्ञान व विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती. त्यामुळे राजीव गांधी स्मृती दिनानिमित्त माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात यावा याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 20 ऑगस्ट 2021 रोजी या पुरस्काराची घोषणा करून 30 ऑक्टोबर 2019 पूर्वी संस्था निवडीचे निकष व चयन महाराष्ट्र तंत्रज्ञान व माहिती महामंडळामार्फत पुरस्कार देण्यात यावा असे शासन आदेशात सांगण्यात आले आहे. 20 ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे स्वरूप आणि निकष याबाबत राज्य सरकारकडून स्पष्ट केला जाणार आहे.
राज्याचे केंद्राला जशास तसे उत्तर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा'चे नाव बदलून 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' असे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या संस्थेला राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे राज्य सरकारचे केंद्र सरकारला दिलेले जशास तसं उत्तर असल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.
राजीव गांधी यांच्या नावाने असलेला खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्यानंतर लगेच राज्य सरकारकडून नव्या पुरस्काराची घोषणा केली जाते. या वेळेवर राम कदम यांनी बोट ठेवलं आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध केला. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिवसेना काँग्रेसनेते त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यासाठी तयार होत असल्याची खरमरीत टीकाही राम कदम यांच्याकडून करण्यात आली आहे.