मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणोशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, मूर्तीची उंची चार फुटापेक्षा अधिक नसावी, पालिकेकडून परवानगी घ्यावी, आरोग्य उपक्रम आयोजित करावे, अशा विविध मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने आज (मंगळवार) जारी केल्या आहे. या नवीन मार्गदर्शक सूचना राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांना लागू असतील. त्यामुळे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांवर अनेक मर्यादा आल्या आहेत.
कोरोना संकटामुळे सार्वजनिक उत्सवावर निर्बंध आले आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातील सूचना जाहीर केल्या आहेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने गणेश मुर्तींच्या विसर्जनसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सरकारच्या या नवीन मार्गदर्शक सूचनानंतर प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या काळात आणखी काही सूचना प्रसिद्ध करण्यात येतील, असे राज्य शासनाने परिपत्रकात म्हटले आहे.
काय आहेत मार्गदर्शक सूचना?
- सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना पालिका किंवा स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यासंबंधित सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत.
- सार्वजनिक गणपतींच्या सजावटीत कोणतीही भपकेबाजी नसावी. सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूटांची आणि घरगुती गणेशमूर्ती २ फूटांची असावी.
- पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी धातू, संगमरवरी मूर्तींचे पूजन करावे. शक्यतो शाडूच्या मातीच्या मूर्तीचे पूजन करावे. गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरी किंवा कृत्रीम विसर्जन स्थळी करावे.
- सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम, रक्तदान शिबीरे यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करावे. आरती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी होणार याची दक्षता घ्यावी.
- गणेशोत्सवात स्वच्छेने दिलेल्या वर्गणी, देणगीचा स्वीकार करा. आरोग्य आणि सामाजिक विषयी संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात.
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनींग सारख्या पर्यायाची व्यवस्था करावी. मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझर पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
- सार्वजनिक मंडळांनी श्रींच्या ऑनलाइन दर्शनसाठी, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक या माध्यमांची व्यवस्था करावे.
- सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती श्री गणेशांच्या मूर्तींचे आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नयेत. विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरूनच करून येणे. विसर्जन स्थळी नागरिकांना जास्त वेळ थांबता येणार नाही.