मुंबई - गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिका कर्मचारी सतत प्रयत्न करत आहेत. तसेच कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी व मुंबईकरांना आपल्या नियोजीत स्थळी पोहचवण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत होते. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना पुढील तीन वर्ष म्हणजेच २०२३-२४ पर्यंत दरवर्षी २० हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. महापालिकेची पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी शिवसेनेने पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना खुश केले आहे.
बोनस वाढवून देण्याची मागणी -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. तेव्हापासून गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग कार्यरत आहे. तसेच या दरम्यान मुंबईकरांना सोयी सुविधा देण्यासाठी आणि मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम पालिका कर्मचारी करत आहेत. तसेच कोरोनाच्या प्रसारा दरम्यान देशभरात लॉकडाऊन लावला असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यावर सामान्य मुंबईकरांना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्ट उपक्रम आणि कर्मचाऱ्यांनी केले. मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये इतका बोनस देण्यात आला होता. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या काळात केलेल्या कामाची दखल घेऊन मागील वर्षापेक्षा बोनसची रक्कम वाढवून द्यावी अशी मागणी पालिकेतील कामगार संघटनांमार्फत केली जात होती. १ नोव्हेंबरपर्यंत बोनस जाहीर केला नाहीतर आंदोलनाचा इशारा दि म्युनिसिपल युनियनने दिला होता.
दोन दिवसांच्या बैठकीनंतर निर्णय -
पालिका कर्मचाऱ्यांना बोनस वाढवून द्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर काल बैठक झाली. मात्र, बोनस किती वाढवावा याबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता. त्यामुळे आज (गुरूवार) पुन्हा मुखमंत्र्यांच्या उपस्थितीत कामगार संघटना, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, पालिका आयुक्त तसेच बेस्टचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये इतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० हजार रुपये बोनस पुढील तीन वर्ष म्हणजेच २०२३ - २४ पर्यंत दिला जाणार आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या बोनसचे स्वागत कामगार संघटनांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पालिका आयुक्त यांचे आभार मानले आहेत. अशी माहिती मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने केल्याचे निमंत्रक ऍड. प्रकाश देवदास यांनी दिली.
बेस्ट कर्मचाऱ्यांना दुप्पट बोनस -
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये इतका बोनस देण्यात येत होता. मागील वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये इतका बोनस देण्यात आला होता. या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्यात आला आहे. मागील वर्षापेक्षा बेस्ट कर्मचाऱ्यांना दुप्पट बोनस देण्यात आला आहे.
असा दिला जाणार बोनस -
पालिका कर्मचारी - २० हजार रुपये
बेस्ट कर्मचारी - २० हजार रुपये
आरोग्य सेविका (भाऊबीज भेट) - ५३०० रुपये
माध्यमिक शिक्षक - १० हजार रुपये
अनुदानित आणि विनानुदानित शाळांमधील कर्मचारी १० हजार रुपये
कॉलेजमधील शिक्षक १० हजार रुपये
शिक्षण सेवक - २८०० रुपये
पार्ट टाइम शिक्षण सेवक - २८०० रुपये
हेही वाचा - कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा